लातूर: लातुरातील अल्पवयीन विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाच्या प्रकरणातील फरार आरोपी बशीर शेख याला अखेर पोलिसांनी गुरुवारी पहाटे अटक केली.‘आदर्श’ नावाने खासगी शिकवणी आणि शाळा चालवणाऱ्या बशीर शेखविरोधात एका अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता.

या प्रकरणानंतर शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी मंगळवारी (दि. ६) ‘आदर्श शिक्षण संकुला’ला भेट देऊन शासनाच्या नियमांनुसार शाळेची तपासणी केली होती. यावेळी शाळेत बशीर शेखची पत्नी प्राचार्या म्हणून उपस्थित होती. मात्र, तपासणीदरम्यान त्यांनी कोणत्याही प्रकारचे अपेक्षित सहकार्य केले नसल्याचा आरोप शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी केला होता.

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसंदर्भात तक्रार पेटी, सीसीटीव्ही कॅमेरे, विद्यार्थी सुरक्षा समिती, परिवहन समिती, माता-पालक संघ आणि शुल्क समिती याबाबत शिक्षण विभागाने विचारणा केली. मात्र, संबंधित समित्यांच्या बैठका किंवा त्यांचे अहवाल तसेच आवश्यक कागदपत्रे दाखविण्यात आली नसल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.

शाळेच्या व्यवस्थापनावरही आक्षेप

शाळेला राज्याची मान्यता असतानाही अभ्यासक्रमासाठी वेगळी पुस्तके वापरली जात असल्याचे तपासणीत आढळल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. शाळेच्या व्यवस्थापनात बेशिस्तपणा, अनधिकृत बाबी आणि नियमबाह्य प्रकार आढळल्याचा उल्लेख तपासणी अहवालात करण्यात आला आहे.

शाळेची मान्यता रद्द करण्यासंदर्भातील कारवाईची जबाबदारी शिक्षण उपसंचालक दीपक चवणे यांच्याकडे असून, शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी शाळा भेटीचा संपूर्ण अहवाल बुधवारी त्यांच्याकडे सादर केला आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रकरण गंभीर असून, कायदेशीर बाबी तपासून कडक कारवाई केली जाईल, असे कुंभार यांनी स्पष्ट केले होते.

फरार आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात…

या पार्श्वभूमीवर बशीर शेख याला पोलिसांनी आज पहाटे अटक केली. अटकेनंतर त्याला लातूर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने बशीर शेख याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.आता या कालावधीत पोलीस आरोपीची चौकशी करून प्रकरणातील पुढील तपास करणार आहेत.

कोर्टाच्या आवारात आरोपीला मारहाणीचा प्रयत्न

न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बशीर शेख याला पुन्हा पोलीस ठाण्याकडे घेऊन जात असताना न्यायालयाच्या आवारातच काहीजणांनी आरोपीला मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत संबंधितांना रोखले. पोलिसांनी आरोपीला सुरक्षितपणे न्यायालयाच्या आवारातून बाहेर काढून पोलीस ठाण्याकडे नेले. या घटनेमुळे न्यायालयाच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.या प्रकरणात आता आरोपीची पोलीस कोठडी, पोलिसांचा पुढील तपास आणि शिक्षण विभागाकडून शाळेवर होणारी कारवाई याकडे लक्ष लागले आहे.