छत्रपती संभाजीनगर : एकीकडे गॅस टंचाईमुळे भर उन्हाळ्यात रांगेत थांबवे लागत असल्याचे चित्र शहरी व निमशहरी भागात दिसत असताना लातूर जिल्ह्यातील आशिव या गावाचे नागरिक निर्धास्त आहेत. कारण आशिव गावाने तीन वर्षापूर्वी बंद पाईपव्दारे गॅसची योजना पूर्ण केली आहे. गावातील १२०० घरांपैकी ९०० घरांना पाईपलाईनव्दारे गॅस पुरवठा होतो.
गावातील सुमारे १२०० घरांपैकी जवळपास ९०० घरांना सध्या पाइपलाइनद्वारे २४ तास गॅस पुरवठा सुरू आहे. त्यामुळे सिलेंडरच्या त्रासातून गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात सुटका झाली आहे. उर्वरित घरांनाही लवकरच गॅस जोडणी देण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली. पूर्वी गावकऱ्यांना गॅस सिलिंडरसाठी बाहेर जावे लागायचे. नोंदणीनंतर वेळेवर गॅस मिळत नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत होता. आता तर स्थिती अधिक गंभीर झाली आहे.
मात्र पाइपलाइन गॅस योजनेमुळे आता घरपोच २४ तास गॅस उपलब्ध होत आहे. तीन वर्षांपूर्वी गावातून नॅचरल गॅस पाइपलाइन गेल्यानंतर कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा करून गावाला गॅस जोडण्या मिळवून दिल्याचा दावा उपसरपंच रमेश वाळके यांनी केला. शहरांमध्ये असणारी ही सोय लातूर जिल्ह्यातील छोट्याशा गावाने स्वीकारली आहे. त्यामुळे परिसरात या गावाचे कौतुक होत आहे.
पाच हजार रुपयांचे अनामत आणि प्रति महिन्याला ८०० ते ९०० रुपयांचा दर गॅस कंपनीकडून आकारणी होती. दोन वर्षानंतर अनामत रकमेतून देयक कापून घेतले जाते. अनामत रक्कमही परत केली जात असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
