छत्रपती संभाजीनगर : लातूर येथे कुंडलीतील दोष निवारणाच्या नावाखाली एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या अत्याचारामुळे विद्यार्थिनी गर्भवती राहिली. याप्रकरणी रामेश्वर हणमंतराव रामदासी ऊर्फ रामेश्वर महाराज (वय ४५, रा. ठाकरे चौक, लातूर) याच्याविरुद्ध विवेकानंद पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांत दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, आरोपी रामेश्वर महाराज हा गेल्या अनेक वर्षांपासून एका आडतीवर पूजापाठ करण्यासाठी जात होता. याच दरम्यान त्याची पीडित मुलीच्या वडिलांशी ओळख झाली. या ओळखीतून त्याचे त्यांच्या घरी येणे-जाणे वाढले. मुलीच्या कुंडलीत दोष असल्याचे सांगत तो दोष दूर करण्यासाठी पूजा करावी लागेल असे समजावले. जून महिन्यापासून आरोपी पूजापाठ करण्याच्या निमित्ताने मुलीच्या घरी येत होता. याच काळात त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. मात्र, या प्रकाराची कोणालाही कल्पना आली नाही. मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे समोर आले. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या वैद्यकीय-कायदेशीर नोंदीच्या आधारे विवेकानंद पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली. पोलिसांनी तपास करून आरोपी रामेश्वर महाराज याला अटक केली.
३० वर्षांपासून पूजापाठ, प्रतिष्ठित देवस्थानात पुजारी
आरोपी रामेश्वर महाराज हा गेल्या ३० वर्षांपासून पूजापाठ करीत असून, शहरातील एका प्रतिष्ठित देवस्थानात पुजारी म्हणूनही कार्यरत आहे. कुंडलीतील दोष निवारणाच्या नावाखाली त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या आरोपीने अशाच प्रकारचे कृत्य अन्य कोणासोबत केले आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. या प्रकरणाचा सर्व बाजूने तपास केला जाईल असे लातूर शहर पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांनी व्यक्त केले.
