छत्रपती संभाजीनगर : लातूर जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था चांगली असल्याचा दावा होत असतानाच चाकूर तालुक्यात नायगाव येथे बी.एन. बार अॅण्ड रेस्टॉरन्टचे मालक गजानन नामदेव कासले (वय ४२) यांना काठीने बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. ही घटना उमरगा रोडवरील बारमध्ये काल रात्री उशिरा घडली.
प्राथमिक माहितीनुसार तिघे अज्ञात मद्यधुंद अवस्थेत बारवर आले होते. त्यांनी सिगरेट मागितली. ती न दिल्याने वाद वाढला आणि तिघांनी गजानन कासले यांना लाकडी काठीने मारहाण केली. या हल्ल्यात कासले यांचा मृत्यू झाला. कासले यांच्या डोक्यात १५ पेक्षा अधिक वेळ काठीने मारहाण केली. ते जमिनीवर निपचित पडले असताना सुद्धा हल्लेखोर वरून सातत्याने काठीने मारत होते. सगळा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. मात्र, हा प्रकार केवळ क्षुल्लक वादातून झाला नसून दरोड्याच्या उद्देशाने घडल्याची चर्चा सुरू आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन आरोपी काठी घेऊन हॉटेलच्या मॅनेजरच्या रूममध्ये जात गल्ल्यातील ड्रॉवर उघडून रोख रक्कम खिशात भरताना दिसतात. त्यावेळी रात्री ११.५० वाजले होते. या हल्ल्यात बारमधील कर्मचारी अजय भरत मोरे (रा. अजनी, ता. अहमदपूर) हे जखमी झाले आहेत. तिघे आरोपी मोटारसायकलवरून आल्याचेही सीसीटीव्हीतील चित्रणावरुन दिसून आले आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. बालाजी नामदेव कासले यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांविरुद्ध जबरी चोरी करून खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
