छत्रपती संभाजीनगर : लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील जवळगा साकोळ येथे अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त भरलेल्या यात्रेत फिरत्या आकाशपाळण्यात बसलेल्या १५ वर्षीय विद्यार्थिनीचे केस पाळण्याच्या बेरिंगमध्ये अडकल्याने तिच्या डोक्याची कातडी आणि केस उपटले गेले. मानवी गोविंद येलके (वय १५, रा. जवळगा साकोळ) असे जखमी विद्यार्थिनीचे नाव असून ती नववीत शिक्षण घेत आहे. या अपघातात ती गंभीर जखमी झाली असून लातूर येथील खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.

तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. सायंकाळी मैत्रिणींसोबत यात्रेतील आकाश पाळण्यात बसल्यानंतर पाळण्याचा वेग वाढला. त्यावेळी तिचे लांब केस पाळण्यात अडकले आणि काही क्षणातच हा भीषण अपघात घडला. घटनेनंतर यात्रेत एकच खळबळ उडाली. उपस्थितांनी तत्काळ तिला उपचारासाठी लातूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. डोक्यावरील संपूर्ण केस गेल्याने त्वचा सोलवटून निघाली. रक्तवाहिन्यांना दुखापत झाली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पातळ्यांवर उपचार करावे लागतील, असे डॉक्टरांनी सांगितले.

मानवी ही अभ्यासात हुशार विद्यार्थिनी असून तिचे आई-वडील मजुरी आणि शेळ्या राखून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गरीब कुटुंबावर अचानक आलेल्या या संकटामुळे गावभर हळहळ व्यक्त केली जात आहे. यात्रांमधील मनोरंजनाच्या साधनांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था असणे आवश्यक असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. विशेषतः पाळण्यात बसताना मुली मुलांचे लांब केस बांधणे, सैल कपड्यांची काळजी घेणे आणि पाळणा चालकांनी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे, हेही या घटनेमुळे स्पष्ट झाले आहे.