छत्रपती संभाजीनगर : पीक विमा आणि दुष्काळ प्रश्नांवर सरकारला निवेदन देत मराठवाड्यातील काँग्रेस कामाला लागल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे चिरंजीव व माजी आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली, २०२३-२४ मध्ये पीक विम्याबाबत दाखल केलेल्या याचिकेतील न्यायालयाच्या निर्देशानुसार धाराशिव वगळता मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांना लाभ द्यावा, अशी विनंती करणारे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले. १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती दिनीही दुष्काळ प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देणार असल्याचे धीरज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
२०२३-२४ मध्ये अतिवृष्टी दरम्यान झालेल्या नुकसानीची माहिती ७२ तासांत संकेतस्थळावर नोंदवली नाही, म्हणून शेतकऱ्यांना पीक विमा नाकारण्यात आला होता. या विरोधात धाराशिवमधील शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या निकालात कठोर तांत्रिक अटींचा वापर करणे योग्य नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. याचा आधार घेऊन विभागीय आयुक्तांनी अन्य शेतकऱ्यांना पीक विमा देण्याच्या अनुषंगाने सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, अशी विनंती केली असल्याचे धीरज देशमुख म्हणाले. हे निवेदन देताना मराठवाड्यातील काँग्रेसच्या सर्व अध्यक्षांना छत्रपती संभाजीनगरला बोलावून घेण्यात आले होते. केवळ पीक विमाच नाही तर या वर्षी मराठवाड्यातील दुष्काळाच्या अनुषंगाने सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यातील पावसाचा खंड आणि त्यामुळे निर्माण झालेली पिकांची दुरावस्था याची माहिती जिल्हाध्यक्षांनी दिली.
कृत्रिम पावसाचीही मागणी
परतीच्या पावसादरम्यान काही ठिकाणी कृत्रिम पावसाचा प्रयोग करून पहावा, असे सुचविण्यात आले. आतापर्यंतचे प्रयोग फसले असले तरी पुन्हा एकदा तो करून पाहिला आणि अपयशातून यश मिळाले तर काही बदल होऊ शकतात, असेही धीरज देशमुख म्हणाले. यावेळी जगन्नाथ काळे, किरण पाटील डोणगावकर, कल्याण दळे, जितेंद्र देहाडे, बाबाजानी दुर्रानी, राहुल सोनवणे, अभय साळुंके, सय्यद आक्रम आदी उपस्थित होते.
