लातूर : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचे अपहरण करून जिवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. रेणापूर तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातील भाजप उमेदवार रवी जाधव यांनी याप्रकरणी काँग्रेसचे उमेदवार सर्जेराव मोरे (रा. पोहरेगाव), शरद कदम (रा. टाकळगाव) यांच्यासह सात ते आठ अनोळखी व्यक्तींविरोधात तक्रार दिली आहे.

भाजपा उमेदवार रवी जाधव यांनी १६ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप आहे. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता शरद कदम यांनी फोन करून जाधव यांना दयानंद महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बोलावले. तेथून चारचाकी वाहनातून त्यांना हॉटेल अरोमा येथे नेण्यात आले.

या ठिकाणी सर्जेराव मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पैशाचे आमिष दाखवले. मात्र अर्ज मागे घेण्यास नकार दिल्यानंतर जाधव यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर जबरदस्तीने जिल्हाधिकारी कार्यालयात नेऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात अर्ज मागे घेण्याचा अर्ज भरायला लावून त्यावर सही घेतल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. यानंतर जाधव यांना काही वेळ औसा रोड परिसरात गाडीतून फिरवण्यात आले. दुपारी साडेतीनच्या सुमारास हॉटेल राजधानीतील खोली क्रमांक २०८ मध्ये डांबून ठेवण्यात आले. रात्री अकराच्या सुमारास तेथून बाहेर पडल्यानंतर त्यांनी सहकाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या

या घटनेचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. भाजप उमेदवाराला न्याय मिळावा आणि प्रशासनाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, या मागणीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. प्रतिस्पर्धी उमेदवाराचे अपहरण करून जबरदस्तीने अर्ज मागे घ्यायला लावणे हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असल्याचा आरोप भाजपने केला आहे. विजय तुमचाच निश्चित होता, तर निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत का दाखवली नाही, असा प्रश्नही भाजप पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. आरोप असलेले सर्जेराव मोरे हे काँग्रेसचे पदाधिकारी असून मागील अनेक वर्षांपासून आमदार अमित देशमुख यांच्या साखर कारखान्यात संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून थेट अपहरण आणि जीवे मारण्याच्या धमकीचे आरोप झाल्याने लातूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.