छत्रपती संभाजीनगर : लातूर जिल्ह्यातील गंगापूर येथील रोहिणी पंकज शिंदे यांनी जिद्द, मेहनत आणि नवतंत्रज्ञानाच्या जोरावर ग्रामीण भागातील महिलांसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. केवळ अकरावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या रोहिणी यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर लातूर जिल्ह्यातील पहिल्या महिला ड्रोन पायलट बनण्याचा मान पटकावला आहे.
रोहिणी शिंदे यांचे पाच जणांचे कुटुंब असून त्यांच्याकडे साडेबारा एकर शेती आहे. पारंपरिक शेती करत असताना आठ वर्षांपूर्वी त्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाशी जोडल्या गेल्या आणि इथूनच त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. त्यांच्या कामातील सातत्य आणि प्रामाणिकपणामुळे २०२३ मध्ये त्यांची ‘ड्रोन दीदी’ योजनेसाठी निवड झाली.
गेल्यावर्षीच घेतले प्रशिक्षण
गेल्यावर्षी पुणे आणि सातारा येथे दोन टप्प्यात त्यांनी ड्रोन चालविण्याचे तसेच ड्रोन द्वारे पिकांवर औषध फवारणीचे प्रशिक्षण पूर्ण केले. खडतर प्रशिक्षणानंतर त्यांना अधिकृत ड्रोन पायलट परवाना मिळाला आणि त्या लातूर जिल्ह्यातील पहिल्या ‘ड्रोन दीदी’ ठरल्या. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोहिणी यांनी दीड लाख रुपये खर्च करून ड्रोन खरेदी केला. सुरुवातीला त्यांनी स्वतःच्या शेतात फवारणी करत सराव केला. त्यानंतर त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात मोफत फवारणी करून या नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून दिली आणि शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला.
माफक दरात सेवा
यानंतर त्यांनी माफक दरात ड्रोनद्वारे फवारणी सेवा सुरू केली. अडीच फूटाखालील पिकांसाठी एकरी ५०० रुपये, ऊस पिकासाठी ७०० रुपये आणि फळबागांसाठी एकरी एक हजार रुपये दर त्यांनी निश्चित केला. गतवर्षी त्यांनी सुमारे १५० ते २०० शेतकऱ्यांच्या २०० एकर क्षेत्रावर फवारणी केली आणि त्यातून सुमारे २५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले.
विश्वासावर कामाचे क्षेत्र वाढले
यावर्षी मात्र त्यांच्या कामाला मोठी गती मिळाली आहे. केवळ तीन महिन्यांत त्यांनी लातूर, चाकूर, रेणापूर आणि औसा तालुक्यातील जवळपास १००० शेतकऱ्यांच्या शेकडो एकर क्षेत्रावर ड्रोनद्वारे फवारणी केली असून, यातून त्यांना अंदाजे चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या उत्पन्नातून त्या आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहेत. ड्रोनद्वारे फवारणीमुळे एक एकर शेतीची फवारणी अवघ्या १५ मिनिटांत पूर्ण होते. यामुळे वेळ आणि मजुरीची बचत होत असल्याने शेतकऱ्यांचा या तंत्रज्ञानाकडे मोठ्या प्रमाणात कल वाढत आहे.
महिलांना मोफत प्रशिक्षण
रोहिणी शिंदे यांची कामगिरी इथेच थांबत नाही. त्या शेतकरी महिला बचतगटातील महिलांना ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण देत असून आतापर्यंत ८७ महिलांना त्यांनी प्रशिक्षित केले आहे. त्यामुळे अनेक महिलांना स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळत आहे. जिद्द, मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाची योग्य सांगड घातल्यास यश निश्चित मिळते, हे रोहिणी शिंदे यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवले आहे.
