छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या प्रकरणी महाराष्ट्रात संतापाची लाट असतानाच लातूर जिल्ह्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून गतिमंद मुलीवर तिच्या बापाने वारंवार अत्याचार केल्याचा गुन्हा जळकोट पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीच्या आईने १७ एप्रिल रोजी जळकोट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यात अज्ञात व्यक्तीकडून मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, पीडित मुलगी सुमारे १९ आठवडे २ दिवसांची गर्भवती असल्याचे समोर आले होते, त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले. तक्रारीनंतर जळकोट पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान संशयाच्या आधारे मुलीच्या वडिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता वडिलांनीच हे कृत्य केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला असून यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत. या घटनेमुळे लातूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून अशा विकृत प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.