छत्रपती संभाजीनगर : लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मध्यरात्री दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत एका तरुणाचा चाकूने खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून काही काळ वाहतूकही खोळंबली होती. प्रज्वल मस्के (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, चौकातील रहदारीच्या ठिकाणी दोन गटांमध्ये अचानक वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत प्रज्वल मस्के याला जबर मारहाण करण्यात आली तसेच चाकूने वार करण्यात आला. याच वेळी घटनास्थळावरून लातूरचे आमदार अमित देशमुख जात असताना त्यांनी ही परिस्थिती पाहिली. त्यांनी तत्काळ मदत करत जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली.
मात्र, उपचार सुरू असतानाच प्रज्वल मस्के याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मारहाण करून पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरू असून, नेमका वाद कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत.

