छत्रपती संभाजीनगर : लातूर महानगरपालिकेच्या महापौरपदी जयश्री सोनकांबळे आणि उपमहापौरपदी ॲड. स्नेहल उटगे यांच्या नावावर अखेर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. दोन्ही पदांसाठी अन्य कोणतेही दावेदार नसल्याने या निवडी बिनविरोध ठरल्या असून, लवकरच हे दोघेही आपल्या पदाची सूत्रे हाती घेणार आहेत.
महापालिकेवर काँग्रेस–वंचित आघाडीचे स्पष्ट बहुमत आहे. लातूर महानगरपालिकेतील १८ प्रभागांमधील एकूण ७० जागांपैकी काँग्रेस पक्षाने ४३ जागांवर विजय मिळवला आहे. वंचित बहुजन आघाडीला ४ जागा मिळाल्या असून, दोन्ही पक्ष मिळून ४७ जागांवर बहुमत मिळवत महापालिकेवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भारतीय जनता पक्षाला २२ जागांवर समाधान मानावे लागले, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) केवळ एका जागेवर विजयी झाले हाेते .
महापौर आणि उपमहापौरपदासाठी जयश्री सोनकांबळे आणि ॲड. स्नेहल उटगे यांचीच नावे समोर येताच या निवडी औपचारिक ठरल्या. चित्र स्पष्ट होताच लातूर महानगरपालिकेच्या प्रांगणात काँग्रेस पक्षाच्या वतीने विजय जल्लोष साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला.
शहरातील महिला सुरक्षितता, स्वच्छता व्यवस्था आणि सीसीटीव्ही यंत्रणांचा विस्तार ही कामे प्राधान्याने राबवली जातील, अशी माहिती दिली.- जयश्री सोनकांबळे, महापौर
शहरातील रस्ते, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापन या मूलभूत समस्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल, पाणी उपलब्ध असूनही उशिरा पुरवठा होतो. पाणीपुरवठ्याचे सुसूत्रीकरण करून लातूरकरांना नियमित आणि मुबलक पाणी देण्यासाठी ठोस मार्ग तयार केला जाईल. — ॲड्. स्नेहल उटगे, उपमहापौर
कोण आहेत जयश्री सोनकांबळे ?
लातूर महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झालेल्या जयश्री सोनकांबळे यांनी भाजपाच्या उमेदवार प्रियंका गायकवाड यांचा १५३ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक १२ मधून अनुसूचित जाती (एस.सी.) महिला गटातून त्यांनी निवडणूक लढवली. वय ४६ वर्षे असलेल्या जयश्री सोनकांबळे यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून, त्या गेल्या १५ वर्षांपासून काँग्रेस पक्षात सक्रिय आहेत.
सामाजिक कार्य आणि पक्षसंघटनात्मक कामातून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवत थेट महापौरपद मिळाल्याने त्यांचे राजकीय पदार्पण विशेष लक्षवेधी ठरले आहे. त्यांचे पती भालचंद्र सोनकांबळे हे खाजगी नोकरीत कार्यरत असून, काँग्रेस पक्षाशी दीर्घकाळापासून जोडलेले आहेत. सामान्य कुटुंबातून पुढे येत महापौरपदापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी मानला जात आहे.
उटगे लक्षवेधी कशा ?
लातूर महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी ॲड. स्नेहल उटगे यांची निवड झाली असून, पहिल्याच निवडणुकीत थेट उपमहापौरपद मिळवणारे ते शहरातील लक्षवेधी नेतृत्व ठरले आहेत. लिंगायत समाजातून येणारे स्नेहल उटगे यांचे कुटुंब अनेक पिढ्यांपासून काँग्रेस पक्षाशी निष्ठावानपणे जोडलेले आहे. वय ४५ वर्षे असलेले स्नेहल उटगे हे एलएलबी शिक्षण पूर्ण करून गेल्या १८ वर्षांपासून वकिली व्यवसायात कार्यरत आहेत. त्यामुळे उटगे यांचे काम लक्षवेधक मानले जाते.
प्रभाग क्रमांक ८ (लातूरचा मुख्य गाव भाग) येथून त्यांनी भाजपाचे दोन टर्म नगरसेवक शैलेश स्वामी यांचा ९७० मतांनी पराभव करत आपली ताकद सिद्ध केली. कायदेशीर अभ्यास, ठाम भूमिका आणि प्रभावी जनसंपर्काच्या बळावर त्यांनी हे यश मिळवल्याचे मानले जात आहे.

