छत्रपती संभाजीनगर : ‘ नीट’ पेपरफुटीचे धागे लातूरपर्यंत येत असल्याच्या तक्रारीनंतर मूळ मुद्रीत प्रश्नपत्रिकेपूर्वी काही प्रश्न हस्ताक्षरात लिहून ते समाजमाध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात आले. आता हे हस्ताक्षर कोणााचे, याचा तपास पोलीस करू लागले आहेत. दरम्यान बुधवारी चौघांची चौकशी झाली होती. त्यात आणखी दोन जणांची भर पडली आहे. यात एका संस्थाचालकाचाही समावेश असल्याचे लातूर पोलीस विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. मूळ प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागामार्फत करण्यात येत असला तरी लातूरच्या तक्रारीमध्ये अनेकांचे जबाब घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना देण्यात आलेला हा हस्तलिखित पेपर नेमका कोणी लिहिला, त्यावरील हस्ताक्षर कोणाचे, आणि त्याचा प्रत्यक्ष फुटलेल्या पेपरशी काही संबंध आहे का, याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे. या पेपरची निर्मिती तो विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहोचला आणि त्यामागे कोणाचे नेटवर्क कार्यरत होते का, याबाबत पोलीस विविध बाजूंनी चौकशी करत आहेत.

पेपरफुटीची तक्रार ज्या शिकवणी वर्गाच्या वर्गाच्या विरोधात होती त्या शिकवणीमधील सीसीटिव्ही चित्रणही पोलिसांनी तपासले आहे. या पूर्वी दोन जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यात आणखी दोन जणांची भर पडली आहे. १२ मे रोजी एका विद्यार्थिनीच्या पालकाने पोलीस अधीक्षक कार्यालयात लेखी तक्रार दिली होती. त्यात, लातूरमधील एका शिकवणी वर्गचालकाने परीक्षेपूर्वी दिलेल्या सराव चाचणीमध्ये ४२ प्रश्न जशास तसे आल्याचा दावा केला होता. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे हे चौकशी करत आहेत.

नीट परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे सर्वाधिक प्रमाण लातूर जिल्ह्यात आहेत. त्यामुळे हा तपास पोलिसांसमोरही आव्हान आहे. या अनुषंगाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागही तपास करत आहे. मात्र, या अनुषंगाने फार काही सांगता येणार नाही. मात्र, शिकवणी वर्ग चालकाची चौकशी करण्यात आल्याच्या वृत्तास लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दुजाेरा दिला.

‘ नीट ’ चा एक पेपर फुटलेला असताना तो पुन्हा हस्ताक्षरात लिहून लातूरमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत स्वतंत्रपणे पोहचविला गेला होता. त्यामुळे हे हस्ताक्षर कोणाचे, याचा तपास पोलीस करत आहेत. चौकशी दरम्यान अनेक जणांचे हस्ताक्षरही तपासले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. अद्यापि या प्रकरणात अद्यापि कोणावर गुन्हा दाखल झाला आहे.