लातूर : जेव्हा लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागले होते तेव्हा २०१६ च्या दुष्काळात निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पात पाणी होते त्या प्रकल्पाच्या पाळूला पुढे भेग पडली. मग ती भेग बुजवली जावी, दुरुस्ती करावी म्हणून अर्ज विनंत्या करण्यात आल्या. शेवटचा पर्याय म्हणून प्रकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर ही बाब टाकण्यात आली. सादरीकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी दुरुस्तीच्या सूचना दिल्या. पण घडले काहीच नाही. मसलगा मध्यम प्रकल्पात गेली तीन वर्षे केवळ १० टक्के पाणीसाठा होता. आता ते पाणी आटले आहे. गावकरी म्हणाले, ‘अहो, आता चिमणीही प्यायला पाणी नाही.’
पाऊस नसल्याने आता दुष्काळ आहे गेली दोन वर्षे नियोजनाचा दुष्काळ होता. आता प्रकल्पात पाण्याचा टिपूसही नाही. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर विश्वास होता, आता तो तरी किती दिवस ठेवावा, असा प्रश्नच आहे या मध्यमप्रकल्पावर अवलंबून असणारे कोतल शिवणी गावचे सरपंच किरण शेकळे हताशपणे सांगत होते. मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूच्या दुरुस्तीला वर्षभरानंतरही मुहूर्त मिळाला नाही. त्यामुळे दहा गावांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
१३ हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या निटूर गावाचा पाणीपुरवठा मसलगा प्रकल्पावर अवलंबून आहे. २०१६ च्या दुष्काळातही धरणात पाणी होते; मात्र मागील तीन ते चार वर्षांपासून प्रशासकीय ढिसाळ नियोजनामुळे काम पूर्ण होऊ शकेल नाही. या प्रकल्पात पाणी आहे, असे गृहीत धरुन जलजीवन मिशिन अंतर्गत पाणीपुरवठ्याची योजना पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले. आता पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न जसाच्या तसा आहे. दुष्काळावर आता उपाययोजना करणारे प्रशासन पूर्वीच जागे झाले असते तर अजून काही दिवस पाणी राहिले असेते. आता चिमणीला प्यायलाही धरणात पाणी नाही.
वेळोवेळी तक्रारी, अर्ज आणि विनंत्या करूनही काहीच होत नसेल तर काय करावे, असा संतप्त सवाल पानचिंचोलीचे माजी सरपंच श्रीकांत साळुंखे यांनी विचारला. निटूरजवळील मसलगा येथे परिसरातील गावांना पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी १४ दशलक्ष घनमीटर म्हणजे साधारणत अर्धा टीएमसी क्षमतेचा मध्यम प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पाळूला २०१६ आणि २०१८ मध्ये भेगा पडल्याचे दिसून आले. तेव्हापासून नियोजनाचा दुष्काळ अनुभवणारे शेतकरी आता प्रत्यक्षात दुष्काळात अडकले. २०२४ मध्ये या भेगा वाढल्या.
आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्र्यांना परिस्थिती दाखवली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवा, असेही सांगितले. पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी धरणाची पाहणी केली होती. येत्या उन्हाळ्यात दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आश्वासनही दिले. दुरुस्तीसाठी १०० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार झाले असतानाही काम प्रशासकीय प्रक्रियेत अडकले.
दहा गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम..
निटूर, गौर, अंबुलगा, आंबेगाव, शिवणी (को.), दापका, तुपडी, शेडोळ, हणमंतवाडी आणि मुगाव पान चिंचोली या दहा गावांचा पाणीपुरवठा या प्रकल्पावर अवलंबून आहे. जलजीवन मिशनअंतर्गत शासनाने या गावांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना उभारल्या आहेत. मात्र धरणातच पुरेसा पाणीसाठा नसल्याने या योजनांच्या उपयोगितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता या गावात पिण्याचे पाणी आणायाचे कोठून असा प्रश्न निर्माण झाला आहे.
‘‘ मसलगा प्रकल्पाच्या पाळूच्या विशेष दुरुस्तीसाठी सुमारे ९०० मीटर लांबीचे काम प्रस्तावित आहे. नाशिक येथील राज्य तांत्रिक समितीच्या तपासणीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सुमारे १०३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक शासनाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर केले आहे. प्रशासकीय मान्यता मिळताच निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरुवात होईल. – रुपाली ठोंबरे, लातूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या प्रशासक तथा अधीक्षक अभियंता
या प्रकल्पाच्या पाण्यावर १ हजार ३६४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. मात्र, पाळूच्या दुरुस्तीला होणारा विलंब आणि पाणीसाठ्यावरील मर्यादांमुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
