छत्रपती संभाजीनगर : ‘ नीट ’ चा पेपरफुटीचे देशभरातील प्रमुख केंद्र असणाऱ्या लातूर शहरातून फेरपरीक्षेत १२०० हून अधिक विद्यार्थी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतील, असे चित्र निकालानंतर स्पष्ट झाले आहे. लातूरमधील प्रसिद्ध राजर्षी शाहू महाविद्यालयात ४५० हून अधिक विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. ६५० पेक्षा अधिक गुण मिळविणारे ५० हून अधिक विद्यार्थी असल्याने ‘एम्स ’ सर्वाधिक प्रवेशही लातूरचे असतील असा दावा केला जात आहे.
विशेष म्हणजे नीट पेपरफुटी प्रकणात अटकेत असलेला शिवराज मोटेगावकरांच्या ‘ आरसीसी ’ शिकवणीत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यास सर्वाधिक ६८६ गुण मिळाल्याचा दावा शिकवणी वर्गाकडून समाजमाध्यमांवर करण्यात आला आहे. लातूरमधील रसायनशास्त्राचा सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी आणि शिवराज पाटील मोटेगावकर सध्या अटकेत आहेत. एका बाजूला चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या लातूर शहरात पुन्हा एकदा फेरपरीक्षेची तयारी करुन घेण्यात आली.
विशेषत: राजर्षी शाहू महाविद्यालयातून पुन्हा परीक्षेसाठी जोर लावण्यात आला. राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य महादेव गव्हाणे म्हणाले, ‘अजूनही निकालाचे पूर्ण विश्लेषण बाकी आहे. पण ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी ६५० हून अधिक गुण मिळविले आहे. एका महाविद्यालयातून सर्वाधिक डॉक्टर निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आम्ही फेरपरीक्षेतही कायम ठेवला आहे.’ ‘ लातूरहून ‘ नीट ’ चा पेपर फुटल्याने लातूरच्या गुणवत्तेच्या प्रारुपावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, फेर परीक्षेतील आकडेवारीमुळे ‘ लातूर पॅटर्न ’ आणि शिकवणीतील हेराफेरी या दोन स्वतंत्र बाकी असल्याचा दावा केला जात आहे.
यंदा राजर्षी शाहू महाविद्यालयातील सुमारे १,४०० विद्यार्थ्यांनी ‘नीट’ परीक्षा दिली. त्यापैकी आतापर्यंत ६०० विद्यार्थ्यांच्या निकालाचे विश्लेषण पूर्ण झाले असून ५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ६०० हून अधिक गुण मिळवले आहेत. उर्वरित ८०० विद्यार्थ्यांच्या निकालाचे विश्लेषण झाल्यानंतर ६०० पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्यांची संख्या आणखी वाढेल. ५३० पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २०० पेक्षा अधिक आहे. गेल्या वर्षी ५३० गुणांना वैद्यकीय प्रवेश बंद झाले होते.
‘लातूर पॅटर्न हा अनेक महाविद्यालयांनी अनेक वर्षांपासून केलेली मेहनत आहे.. नीट पेपर फुटी लातूरचा कनेक्शन उघड झालं. काही लोकांच्या अनैतिक मार्गामुळे लातूर पॅटर्नवर बदनामी चा डाग आल होता. मात्र, विद्यार्थ्यांनी पालकांनी शिक्षकांनी एकत्र येत लातूरमधून पुन्हा यश मिळाले आहे. गतवर्षीपेक्षा यावेळेस लातूर पॅटर्न मधून एमबीबीएसला खासगी आणि शासकीय या ठिकाणी लागणाऱ्या विद्यार्थ्यांचे संख्या गतवर्षीपेक्षा यावर्षी नक्कीच वाढलेली असेल अशी निकालावरून दिसत आहे, ’ असे मत शाहू महाविद्यालयाचे संचालक दिलीप देशमुख यांनी व्यक्त केले.
