छत्रपती संभाजीनगर : रस्ते अपघातामध्ये दररोज सरासरी ४३ मृत्यू होतात. त्यातही दुचाकीस्वार जास्त. कारण हेल्मेट न वापरणे. हेल्मेट वापरण्याचे वारंवार आवाहन करुनही उपयोग काही होत नाही. म्हणून लातूरच्या पोलिसांनी नवी जागृतीची पद्धत सुरू केली. अपघातानंतर चेंदामेंदा झालेल्या दूचाकी गाड्या आणि चारचाकी गाड्याच रस्त्यावर दिसतील अशा पद्धतीने लावण्यात आल्या. लातूर जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा उपक्रम सध्या लक्षवेधी ठरतो आहे.
खरे तर अपघातामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. २०२६ च्या जानेवारी ते मार्च या कालावधीत राज्यात ९,२५९ अपघात झाले असून त्यात ३,८५८ जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच दररोज सरासरी ४३ जणांचा बळी जात आहे. २०२४ मध्ये १५,७१५ तर २०२३ मध्ये १५,३६६ मृत्यूंची नोंद झाली होती. विशेष म्हणजे, एकूण मृतांपैकी तब्बल ५७ टक्के मृत्यू हे दुचाकीस्वारांचे आहेत. हेल्मेट न वापरणे हे यामागील प्रमुख कारण मानले जात आहे. वारंवार सांगूनही हेल्मेट मात्र कोणी वापरत नाही.
प्रत्येक जिल्ह्यात अपघात प्रवण क्षेत्र आहेत. त्याचे फलकही लावलेले असतात. पण गाडी चालविण्याची घाई एवढी की, कोणी वेग कमी करायचा तयार नाही. हे लक्षात आल्यानंतर लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे म्हणाले, ‘अपघाताचे गांभीर्य लक्षात यावे म्हणून जुनी वाहने आम्ही रस्त्यावर लावली. अपघातातील वाहनांची अवस्था आणि मृत्यू याची भीती लक्षात घेऊन लोक हेल्मेट वापरु लागतील, असा संदेश आखला आहे. लातूर जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांतर्गत ही प्रक्रिया सुरू केली आहे.’ चारचाकी गाडीत आसनाला असणारा पट्टा बांधला तरी अपघातामधील मृत्यू कमी होतील. पण ते केल्याने अपघातामधील संख्या वाढते आहे.
काय सांगते आकडेवारी?
लातूर जिल्ह्यात २०२४ साली ८०२ अपघात झाले, त्यात ३७० जणांचा मृत्यू झाला. तर त्या पुढील वर्षात २०२५ मध्ये ८४९ रस्ते अपघात झाले, त्यात ३८४ जणांचा मृत्यू झाला. यावर्षी मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत २१३ अपघातांमध्ये ११३ लोकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये ६२ मृत्यूचे प्रमाण दुचाकीस्वारांचे आहे.
पोलिसांनाही हेल्मेट सक्ती
जिल्ह्यातील पोलिसांना हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षा नियमांचे पालन करण्यास सांगणाऱ्या पोलिसांनाही नियम बंधकारक आहेत. तसे न केल्यास अशा पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करून त्याची नोंद सेवा पुस्तिकेमध्ये घेतली जाणार आहे.
