छत्रपती संभाजीनगर : विंधन विहिरीच्या मोटारीतील तांब्याची तार चोरी केल्याच्या संशयावर तीन अल्पवयीन मुलांना खांबाला बांधून मारहाण करण्यात आली. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील खारोळा या गावी ही घटना घडली आहे. या घटनेचे चलचित्रण समोर आल्यानंतर पोलिसांनी कायदा हातात घेतला म्हणून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तीन अल्पवयीन संशयित आरोपीस खांबाला बांधून रबरी पाईपने मारहाण होत असल्याचे चलचित्रणाच्या आधारे पोलिसांनी सचिन नारायण राऊतराव (वय ४०) आणि नितीन गोविंद शिंदे (वय ३८) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने आणि रेणापूरचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक आणि संबंधित कुटुंबीयांशी संवाद साधत परिसरात शांतता आणि सलोखा कायम राखण्याचे आवाहन केले. अफवा पसरवणे, दिशाभूल करणारे संदेश प्रसारित करणे किंवा समाजात तेढ निर्माण करणारी माहिती शेअर करणाऱ्यांविरुद्धही आवश्यक त्या कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
मोटारीमधून वायर चोरुन विक्री करण्याचे प्रकार अलिकडे वाढले आहेत. विशेषत: पवन उर्जा प्रकल्पातून वायर चाेरी करणाऱ्यांच्या टोळ्याही लातूर व धाराशिव जिल्ह्यात सक्रिय आहेत. यात आता अल्पवयीन मुलेही सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे. चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलांचा आधी शोध घेण्यात आला. मुलांना खांबांना बांधण्यात आले आणि मारहाण करत त्याचे चलचित्रणही शेतकऱ्यांनीच केले. एका मोटारीतून २५ ते ३० फूट ताब्यांची तार निघते. त्यातून ४०० ते ५०० रुपये मिळतात. यामुळे ग्रामीण भागात या चोऱ्या वाढले असल्याचे सांगण्यात येत आहे. या पूर्वी या अल्पवयीन मुलांवर अन्य कोणतेही गुन्हे नव्हते, असे पोलिसांनी सांगितले.
