छत्रपती संभाजीनगर – लातूर जिल्ह्यातील व तालुक्यातील मुरुड, करकट्टा परिसर सोमवारी रात्री ९.४५ ते १०.०५ वाजण्याच्या सुमारास अनामिक धक्क्यांनी हादरला. या प्रकाराने स्थानिक नागरिकांमध्ये भूकंपाच्या समजुतीने भीतीचे वातावरण पसरले होते. यातील काहींनी आवाज, धक्के जाणवताच घर-दार सोडून मोकळी मैदाने गाठली होती. काहींनी या घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला कळवली.  लातूर जिल्ह्यातील किल्लारीमध्ये ३० सप्टेंबर १९९३ सालच्या पहाटे  प्रलयंकारी भूकंप होऊन हजारो नागरिकांचा मृत्यू झाला होता. गणपती विसर्जनाच्या दिवशीची ही दुर्घटना लातूरकर व धाराशिवकरांच्या मनावर कोरली गेलेली आहे.

भूकंपाचा हा इतिहास असताना पुन्हा त्याची पुनरावृत्ती होते की काय, अशी भीती जिल्ह्यातील नागरिकांमध्ये कायम असते. किल्लारी, धाराशिवच्या लोहारा परिसरामध्ये तेव्हापासून आजही अधून-मधून भूगर्भातून आवाज येणे, भूकंपासदृश्य धक्के जाणवण्याचे प्रकार घडत असतात. भूगर्भातील धक्क्यांच्या बाबतीतील संवेदना स्थानिक नागरिकांच्या अधिक असल्याने सतर्कता आणि भीती हे दोन्ही प्रकारही दिसून येतात.

आजही (सोमवारी – १५ डिसेंबर) रात्री ९.४५ ते १०.०५ या २० मिनिटांच्या वेळेत मुरूड, करकट्टा येथे मोठा आवाज होऊन भूकंप सदृश्य धक्का जाणवल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू होती. काही भयभीत झाले होते. त्यातूनच काहींनी ही माहिती स्थानिक प्रशासनाकडे पोहोचवली होती.

सबब माहितीची जिल्हा प्रशासनाने त्वरित नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडे तपासणीसाठी पाठपुरावा केला.

तपासणीचा निष्कर्ष : नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) कडून करण्यात आलेल्या तपासणीनुसार, लातूर तालुक्याच्या भौगोलिक कार्यक्षेत्रात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नाही.

जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांनी कळवले आहे.