छत्रपती संभाजीनगर – लातूर शहरातील स्क्रॅप मार्केट (भंगाराची बाजारपेठ) परिसरात वायरच्या दुकानाला सोमवारी भीषण आग लागली आहे. शॉर्टसर्किटमुळे मोठा स्फोट होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीची तीव्रता प्रचंड असल्याने आजूबाजूच्या चार ते सहा दुकानांनाही आगीने आपल्या कवेत घेतलं आहे. आगीच्या घटनास्थळी अग्निशमन दलाचे दोन बंब दाखल असून, आग विझवण्यासाठी अधिकारी व जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
आग लागलेल्या दुकानांमध्ये वायर आणि इतर ज्वलनशील साहित्य असल्याने आगीने रौद्ररूप धारण केलं आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. वाढती आग आणि गर्दी अशा दुहेरी संकटाचा सामना अग्निशमन दलाला करावा लागत आहे.
पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग इतर दुकानांमध्ये पसरू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी आणखी अग्निशमन यंत्रणा मागवण्याची शक्यता आहे.या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. आग लागलेल्या दुकानांमधील साहित्य जळून खाक झाले आहे.
या घटनेत किती नुकसान झाले आहे, याची माहिती आग पूर्ण आटोक्यात आणल्यानंतर पुढे येऊ शकेल, याची माहिती मिळू शकणार आहे. त्यानंतरही झालेले नुकसान हे काही लाखांमध्ये असल्याचे पीडित व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.
