छत्रपती संभाजीनगर : कॉग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकुरकरांच्या पुतळ्यासाठी आता भाजप आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या आवारात पुतळा बसवू असे जाहीर केले होते. पण कॉग्रेसने पुतळ्याची जागा बदलली. यावरुन वाद सुरू झाला आहे. दुसरीकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७५ फुटी पुतळ्याची उंची चबुतऱ्या धरुन की सोडून यावरुनही वाद रंगले आहे. विशेष म्हणजे लातूरमध्ये सध्या १५ पुतळे आहेत. ११ प्रस्तावित आहेत आणि नव्याने दोन पुतळ्याची भर यात पडणार आहे.

लातूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत दोन पुतळ्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी भाजप आमनेसामने आले. घोषणाबाजी, आरोप-प्रत्यारोपात २८ विषय मंजूर करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ प्रकल्प उभारण्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीपूर्वी घेण्यात आला हाेता. ७५ फूट पुतळ्याची उंची कशी मोजायची असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. पुतळ्याच्या निमित्ताने चर्चा न करताच २८ विषय मंजूर करण्यावर आता आक्षेप घेतले जात आहेत. भाजपच्या नगरसेविका प्रेरणा होनराव म्हणाल्या , ‘ दोन मिनिटांत २८ विषय वाचून मंजूर करणे निषेधार्ह आहे. पुतळ्यांसारख्या संवेदनशील विषयांवर चर्चा न करता एकांगी निर्णय घेणे चुकीचे आहे. आम्ही हा विषय जनतेत नेऊन आंदोलन उभे करू. ’ या विषयामध्ये भाजपने राजकारण केले असा आरोप महापौर जयश्री कांबळे यांनी केला.

लातूरच्या राजकारणात पुतळ्यांचे वाद नवीन नाहीत. १९९५ मध्ये महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याच्या मुद्द्यावरून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राजकीय फटका बसला होता. आता पुन्हा एकदा पुतळ्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. चार वर्षापूर्वी लातूर शहरात नवीन ११ महापुरुषांचे पुतळे उभारण्याचा प्रस्ताव २०२२ मध्ये मंजूर करण्यात आला होता. यातील भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या क्रांतिकारकांच्या पुतळ्यांसाठी यापूर्वीच निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. आता उर्वरित पुतळ्यांसाठीही निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

कोणाकोणाचे पुतळे उभारणार

नवीन ११ पुतळ्यांमध्ये राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजीराजे, लोकमान्य टिळक, क्रांतिवीर लहुजी साळवे, महाराणा प्रताप, माता रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले आणि शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या पुतळ्यांचा समावेश आहे. याशिवाय भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या पुतळ्यांची उभारणी प्रस्तावित आहे.

लातूरमध्ये यापूर्वी १५ पुतळे….

शहरात यापूर्वीच १५ महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. यामध्ये अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजीव गांधी, महात्मा बसवेश्वर यांचे दोन पुतळे, यशवंतराव नाईक, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दोन पुतळे, अण्णाभाऊ साठे, राजर्षी शाहू महाराज, स्वामी विवेकानंद, विलासराव देशमुख आणि माणिकराव सोनवणे यांच्या पुतळ्यांचा समावेश आहे.

प्रत्येक पुतळ्यासाठी २५ लाखांचा खर्च

नवीन पुतळ्यांसाठी प्रत्येकी सुमारे २५ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. काही पुतळ्यांसाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून, काही पुतळ्यांसाठी जागेचा शोध सुरू आहे.