निशांत भद्रेश्वर
लातूर : लातूर शहराला दुष्काळ झळा जाणवू लागल्या असून, धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात केवळ १० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी शहराच्या पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. १ ऑक्टोबरपासून लातूर शहराला आता चारऐवजी सहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. परिणामी शहरातील पाणी बाजारात तेजी येईल. शहरात १७ प्रभागांत १०० हून अधिक शुद्ध पाणी जारविक्री केंद्र आहेत. आता ४० लिटरच्या जारचा दर २० रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे.

लातूर शहरात चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता आता दोन दिवसांचे अंतर वाढवण्यात आले आहे. जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांमध्ये जवळपास सात टक्के, तर १३५ लघु प्रकल्पांमध्ये सुमारे १५.५ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. अनेक नदी-नाले आणि तलावांमध्येही पाण्याची पातळी तळाला गेली आहे.

मांजरा धरणातील उपलब्ध पाण्यावर लातूर शहराची तहान डिसेंबरअखेरपर्यंत भागवता येण्याचा अंदाज आहे. प्रकल्पांमधील उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले असून, पर्यायी पाणी स्रोत म्हणून विहिरींचे अधिग्रहण करण्याची कार्यवाहीही करण्यात येत आहे. आगामी काळातील पाणीटंचाई लक्षात घेता नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. लातूर शहरातील सांडपाण्याची मदार घरोघरी असणाऱ्या विंधन विहिरीवर अवलंबून आहे. दीपावलीपर्यंत बोअरचे पाणी आटले, की अडचणी वाढतील, असे सांगण्यात येत आहे.

शहरात किती ठिकाणी पाणी शुद्धीकरणाची व्यावसायिक केंद्रे सुरू आहेत, याची माहिती महापालिकेकडे सध्या उपलब्ध नाही. मात्र, महापालिकेचे उपायुक्त पंजाबराव खानसुळे म्हणाले, ‘आम्ही या अनुषंगाने बैठक घेणार आहोत. किती व्यावसायिक पाणी शुद्धीकरण केंद्र आहेत. कोणत्या स्रोतातून ते पाणी घेत आहेत, याची माहिती घेऊ.’

लातूर शहराला दररोज ६० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. हरंगुळ येथील जलशुद्धीकरण प्रकल्पातून शहरातील ११ पाण्याच्या टाक्यांमध्ये हे पाणी जमा केले जाते. पाणी पुरवठ्यासाठी शहराचे तीन भाग केलेले आहेत. दर सहा दिवसांच्या फरकाने हा पाणीपुरवठा केला जातो. आता त्यात मोठे बदल करण्यात आले आहेत. २०१६ च्या दुष्काळात २० दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत असे तेव्हापासून पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था शहरामध्ये आहे. मात्र, या वर्षी टंचाईला खूप लवकर सुरुवात झाल्याने पाणीकपातीचे संकट ओढावले आहे. एका बाजूला पाणीकपात दुसरीकडे पाणीबाजाराला तेजी असे चित्र आहे.