लोकसत्ता प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : कुत्र्याला रेल्वे रुळावरुन ओढत असताना रेल्वेचा धक्का लागल्याने वकिलासह कुत्र्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना संग्रामनगर उड्डाणपुलाखाली शुक्रवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घडली. अॅड. भाऊसाहेब सुखदेव लांडगे (५५, रा. कासलीवालपुरम्, गादीया विहार, मुळ रा. धामोरी, लासूर स्टेशन) असे मृताचे नाव आहे.

गादीया विहार परिसरातील अॅड. भाऊसाहेब लांडगे हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी दोन कुत्र्यांना घेऊन फिरण्यासाठी गेले होते. जाबिंदा लॉन्सच्या परिसरात कुत्र्यांना फिरवून आणताना ते संग्रामनगर उड्डाणपुलाखाली आले. यावेळी चिकलठाण्याकडून रेल्वे स्थानकाच्या दिशेने रेल्वे धावत होती. अगदी रेल्वे रुळाजवळ आलेले असताना अॅड. लांडगे यांनी एका कुत्र्याला रुळ ओलांडून दिला. मात्र, दुसरा कुत्रा रुळ ओलांडत नव्हता. त्यामुळे त्याला अॅड. लांडगे ओढून रुळा पलिकडे आणण्याचा प्रयत्न करत होते. याचदरम्यान, उत्तर दिशेकडून दक्षिणेकडे कुत्र्याला ओढत असताना दोन्ही रुळांच्या मध्ये कुत्रा थांबल्यामुळे तो रेल्वेखाली सापडला. तर अॅड. लांडगे यांना रेल्वेचा जबरदस्त धक्का बसल्यामुळे ते पुर्व दिशेकडून पश्चिमेकडे ओढल्या गेले. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

आणखी वाचा-Ladki Bahin Yojna : योजनेविरोधात ‘सावत्र भावांचा’ अपप्रचार; मुख्यमंत्र्यांचा टोला, लाडकी बहीण योजनेच्या दोन लाख लाभार्थींचे अर्ज मंजूर

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पुढे जवाहरनगर आणि उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले. त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद जवाहरनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.