धाराशिव : उन्हाळा संपला की लिंबाचा दर घसरतो. आजवरचा बाजाराचा हा नियम यंदा पावसाळ्यातच बाद ठरला आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबाने पावसाळ्यातील आजवरचा उच्चांकी दर गाठला आहे. किरकोळ बाजारात १२० रुपये किलो पर्यंत दर वाढले आहेत. तर बाजार समित्यांमध्ये सोमवारी ठाेक बाजारात हिरवा लिंबू ९५ रुपये किलो, मिक्स लिंबू – ९२ रुपये किलो, पिवळा लिंबू ९० रुपये किलो पर्यंत चढा होता. असा उच्चाकी दर मिळाला.
मागील दोन वर्षांचा इतिहास पाहता पावसाळ्यात लिंबाचे दर कोसळायचे. २०२४ – २५ मध्ये पावसाळ्यात हिरव्या कच्च्या लिंबाला १० ते १५ रुपये किलो, तर पिवळ्या तयार लिंबाला १८ ते २२ रुपये किलो दर होता. लोणचे उद्याेंगाना ८ ते १० रुपयांनी माल विकावा लागत होता. अगदी गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२५ मध्येही बाजार समितीत १० ते १२ रुपये किलो दर होता.
गेल्यावर्षी अवकाळी आणि सततचा सहा महिने सुरू असलेल्या पावसामुळे लिंबाच्या बागेत फुलगळ मोठ्या प्रमाणात झाली. माल सडला, उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा जास्त घटले. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात मार्च-एप्रिलमध्ये लिंबाने १८० ते २०० रुपये किलोचा टप्पा गाठला होता. मे महिन्यात आवक झाली आणि दर ३० ते ४० रुपयांवर आले होते, पण आता पुन्हा कमी पावसामुळे आवक कमी झाली आहे.
“पाऊस थांबल्यावर हिरव्या लिंबाची आवक वाढते, पण यंदा पाऊसच नसल्याने मे आणि जून महिन्यात झालेली फाळधारण टिकली नाही तसेच असलेला माल फुगला नाही. . त्यामुळे चांगल्या प्रतीच्या मालाला ९०-९५रुपये दर मिळत आहे, जो पावसाळ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच आहे,” असे व्यापारी रेहान बागवान यांनी सांगितले.
हॉटेल चालकांना होलसेल बाजारात ९५ रुपये असलेला लिंबू किरकोळ बाजारात १२० ते १४० रुपये किलो खरेदी करावा लागत आहे. गतवर्षीच्या पावसाळ्याच्या तुलनेत यंदा लिंबू दुप्पट दराने मिळत आहे. पुढील पितृपक्ष आणि नवरात्रीपर्यंत हेच दर टिकून राहण्याची शक्यता आहे.
