जालना – जिल्ह‌यातील अंबड तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक येथे विहिरीमध्ये रविवारी आढळून आलेल्या बिबट्यास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडले. बिबट्या विहिरीमध्ये मोटरच्या पाईपला धरून बसल्याचे एका शेतकऱ्याच्या पाहण्यात आले आणि त्यांनी त्यांच्या शेतजमीन मालकाला ही माहिती दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक पाथरवाला येथे दाखल झाले होते.

जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश टोपे यांच्या शेतातील विहिरीत हा बिबट्या आढळून आला. या संदर्भातील माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पिंजरा लावून बिबट्याला पकडले.

रविवारी सकाळी शेतातील विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीस विहिरीमध्ये बिबट्या मोटारीच्या पाईपला धरून पाण्यावर तरंगत असल्याचा दिसला. त्यानंतर तात्काळ वनविभागाला कळविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत विहिरीभोवती बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने विहिरीत पिंजरा टाकून जवळपास तासभर प्रयत्न करून बिबट्यास पिंजऱ्यात पकडले. बिबट्यास पिंजऱ्यात पकडल्यानंतर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र पिंजऱ्यात बंद केलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी बच्चे कंपनी, तरूण, ज्येष्ठांनीही गर्दी केली होती.