अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अध्यक्षांकडून शिफारसपत्र

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनपट, राजकीय प्रवास आणि पाच वर्षातील कामांची माहिती देणारे  ‘कॉफीटेबल’ पुस्तक  राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांना पाठविले जात असून त्याची किंमत दहा हजार रुपये आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांनी हे पुस्तक घेण्याची शिफारस केल्याचे पत्रही सोबत जोडत पुस्तकाचे देयकही पाठविले जात असल्यामुळे ही महागडी पुस्तक खरेदी महाविद्यालयांच्या माथी मारली जात असल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू झाली आहे.

मोदींची  चहावाला ते पंतप्रधान अशी आशय मांडणी असणाऱ्या या पुस्तकात  पाच वर्षातील कामाचा आढावा असल्याचा दावा करत माजी राज्यसभा सदस्य जॉन एफ फर्नांडिस यांनी एक पत्र पाठविले असून त्यासोबत देयकही पाठविले जात आहे. औरंगाबाद येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयास हे पुस्तक आल्यानंतर कदाचित ते भेट म्हणून आले असावे असा महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा समज झाला. पण त्यासोबतचे दहा हजार रुपयांचे देयकही असल्याने ही रक्कम करोनाच्या अशा काळात खर्चावी का, असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला.हे पुस्तक  युएसए पब्लिकेशन अ‍ॅण्ड डिस्ट्रिब्युशन न्यूयॉर्क येथून प्रकाशित झाले असून त्याचे स्थानिक वितरण मल्टिनॅशनल पब्लिकेशनकडून केले जात असल्याचे बार असोसिएशनच्या उपाध्यक्षांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

होतेय काय?

केवळ  अभियांत्रिकीच नव्हे तर अन्यही संस्थांना मोदींवरील ४.२ किलोग्रॅम वजनाचे हे जाडजूड पुस्तक खरेदी करण्यास सांगण्यात येत आहे. मजकूर कमी आणि छायाचित्रे अधिक अशा स्वरूपाच्या या कॉफीटेबल पुस्तकाची उंची १७.५ तर रुंदी १२.७ इंच अशी आहे. पुस्तक संस्थांना पाठवून नंतर त्याचे देयक (बील) पाठविले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील पुस्तकात पुष्कळ प्रकारची माहिती आहे. सचिव पातळीवरीलही बरीच माहिती असल्याने हे पुस्तक घेण्याविषयीची शिफारस केलेली आहे. पण त्याचे देयक अदा करणे अनिवार्य नाही. बरेच जण दूरध्वनी करून किंमत कशी अदा करायची अशीही विचारणा करत आहेत. बरेच जण ती रक्कम भरत आहेत, पण रक्कम देणे आवश्यक नाही. ते पुस्तक एकप्रकारे भेटच आहे. या पुस्तकात अन्य माहितीबरोबरच पंतप्रधानांचे व्यक्तिमत्त्वही दिसून येते म्हणून हे पुस्तक पाठविलेले आहे.’’ -अनिल सहस्रबुद्धे, अध्यक्ष अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद

थोडे पुस्तकाविषयी…  नरेंद्र मोदी- हरबिंजर ऑफ प्रॉस्पॅरिटी अ‍ॅण्ड अपोस्टल ऑफ वल्र्ड पीस’ असे या पुस्तकाचे नाव असून त्यातील प्रत्येक पृष्ठ गुळगुळीत कागदपुठ्ठयासारखे आहे. त्यावर सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विविध छायाचित्रे आहेत.

पुस्तक आले कसे ?  या पुस्तकाच्या प्रती पाठविण्यासाठी पत्ते कोणी दिले याचाही शोध घेतला असता ज्या अभियांत्रिकी महाविद्यालयात बार कॉन्सिलच्या परीक्षा झाल्या आहेत त्या सर्वांचे पत्ते मिळाल्यानंतर ही पुस्तके पाठविण्यात आली असून त्या सोबत अनिल सहस्रबुद्धे यांनी केलेले पुस्तक घेण्याविषयीचे शिफारस पत्रही जोडण्यात आल्याची बाब समोर आली.