औरंगाबाद : अजिंठा लेणीमधील चित्र दीर्घ काळापर्यंत टिकावे असे वाटत असेल तर येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर आणि चित्र पाहण्याच्या वेळवर मर्यादा आणायला हवी असे मत पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक मीनलकुमार चावले यांनी व्यक्त केले. औरंगाबाद येथे लेणी मार्गदर्शक (गाईड) परिषदेमध्ये ते बोलत होते. अधिक पर्यटकांमध्ये लेणीमध्ये आद्र्रता वाढते. त्यामुळे हा चित्र ठेवा दीर्घकाळ टिकून रहावा असे वाटत असेल तर गर्दीवर नियंत्रण आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
अजिंठा येथे बौद्धकालीन लेणींमध्ये कमालीचे सुंदर चित्रे आहेत. त्यातील काही चित्रे आता धुसरही होऊ लागली आहेत. आद्र्रतेचा लेणीचित्रांवर वाईट परिणाम होतो. सध्या ४० पर्यटक एका वेळी तेही दहा मिनिटांसाठीच लेणीमध्ये पाठवले जातात. पर्यटक आत गेल्यानंतर तेथील अंधाराशी जुळवून घेण्यातच पाच- सहा मिनिटे लागतात. त्यापेक्षा तिथे न जाताच चित्रांचा अभ्यास करणाऱ्यांनी तसेच पर्यटकांना अजिंठा अभ्यागत केंद्रातील केंद्रात अधिकची माहिती दिली जाऊ शकते. अलीकडच्या काळात लेणी पहावयास येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे, त्यामुळे निर्बंधाबाबत विचार व्हावा असे चावले म्हणाले. पर्यटन महामंडळाकडून पर्यटनाला चालना देण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करताना पर्यटन क्षेत्रातील माहीतगार व्यक्तीची नेमणूक व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.




अजिंठा लेणीचित्रांवर जगभरातील चित्रकार अभ्यास करत असतात. चित्रांचा रंगरेषाचा तर अभ्यास होतोच शिवाय त्यातील वेशभूषा, आभूषणे, केशसांभार यावरूनही त्याचा अभ्यास केला जातो. कालखंड आणि चित्रांचा अभ्यास करताना या चित्रांचे रंग कोणते हे रंग कसे बनविले याचीही कमालीची उत्सुकता आहे. लेणीचित्रांमध्ये रंगाबरोबर गांजाच्या पानांचे मिश्रण असावे असा अभ्यास करण्यात आला होता. गांजाची पाने हवेतील आद्र्रता शोषून घेते. त्यामुळे ही चित्रे अनेक वर्षे टिकली असल्याचा दावा एका पुरातत्त्व अभ्यासकाने केला होता. आता धुसर झालेली चित्रे वाचविण्यासाठी पर्यटक संख्येवर नियंत्रण आणण्याची सूचना करण्यात आली आहे. अजिंठा अभ्यागत केंद्रातील लेणी व चित्रांचा अन्वयार्थ लावण्यापुरतीच जागा व जबाबदारी पुरातत्त्व विभागाकडे दिली जावी अशी लेखी सूचना या पूर्वी राज्य सरकारला करण्यात आली असल्याचेही चावले यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले. दरम्यान पर्यटकसंख्येवर नियंत्रण आणण्याबाबतचे मत लेखी स्वरूपात कळविण्यात आले नसल्याचेही त्यांनी सांगितले.