नांदेड : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका तिच्यावर पतीनेच गावठी पिस्तुलातून गोळी झाडून तिला मारण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील लोहा शहरात सोमवारी रात्री उशिरा घडला. या प्रकरणी लोहा पोलीस ठाण्यात आरोपी विशाल सुरेश जाधव याच्याविरुद्ध मंगळवारी दुपारनंतर भारतीय न्याय संहिता भारतीय न्यायसंहिता तसेच शस्त्र अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. या घटनेमुळे लोहा शहरात एकच खळबळ उडाली आहे. गोळीबारात जखमी झालेल्या तरुण महिलेवर नांदेडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अर्चना विशाल जाधव (वय १९, रा. शिक्षक कॉलनी, लोहा) यांनी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना ६ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे १०.३० ते ११.०० वाजण्याच्या दरम्यान शिक्षक कॉलनी परिसरात घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणातील फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपीने “तुझे काका का बोलले?” या कारणावरून तसेच चारित्र्यावर संशय घेत प्रथम शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्यानंतर थापड, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पुढे आरोपीने त्याच्या ताब्यातील बंदुकीतून फिर्यादीच्या पाठीकडे व डोक्याकडे गोळी झाडून तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

त्याचवेळी आरोपीने फिर्यादीच्या वडिलांना दूरध्वनी करून “तुझ्या पोरीला गोळी घातली, आता तुझ्याकडे येतो,” अशी धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी लोहा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९, ११५(२), ३५१(२), ३५१(३), ८५ तसेच शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ३, ५, २५ व २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक संदीप भोसले यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोकाटे यांच्या आदेशानुसार गुन्ह्याची नोंद केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. वरील घटनेनंतर आरोपी विशाल जाधव फरार झाला. त्याचा शोध सुरू असल्याचे लोहा पोलिसांनी सांगितले. लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पेट्रोलपंपावरील दरोड्याच्या प्रकरणातही विशाल जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.