छत्रपती संभाजीनगर – लंडन येथे एमबीए पदवीच्या शिक्षणासाठी गेलेली मुलगी गायब झाल्याने तिच्याविषयीचे गूढ वाढले होते. अखेर मुलगी भारतातच आणि पुण्यात असल्याचे कळले, परंतु पाठोपाठ तिचा मृतदेह आढळून आल्याचे सांगताच कुटुंबीयांना गुरुवारी सकाळी मोठा धक्का बसला. तत्पूर्वी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या उस्मानपुरा पोलिसांनी या मुलीचा तांत्रिक माहिती आधारे तपास करून, तिची माहिती काढली होती. त्यानुसार उस्मानपुरा पोलीस मृत मुलीच्या लोकेशनवरून पिंपरी चिंचवड येथील शिरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घहुंजे भागातील एका इमारतीत पोहोचले असता, या रुममध्ये कुटुंबीयांसाठी बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह आढळला. मृत मुलीचे नाव मुग्धा देशमुख (वय ३४) असे आहे. या मुलीच्या मृत्यु प्रकरणात पिंपरी चिंचवडच्या शिरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक मुदीराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अविनाश भास्करराव देशमुख यांच्या तक्रारीवरून त्यांची मु्लगी मुग्धा देशमुख ही बेपत्ता असल्याबाबत गुन्हा २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी दाखल करण्यात आला होता. अविनाश देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीत, देशमुख हे महापालिकेतून सेवा निवृत्त झालेले अधिकारी आहे. त्यांची मुलगी २०२५ च्या जुलैमध्ये एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेली होती. २३ ऑक्टोबर रोजी मुग्धा ही तिच्या आईशी शेवटचे बोलली होती. तिची मुलाखत असल्याचे सांगून तिने घाई घाईने फोन ठेवला होता. २४ ऑक्टोबरला पुन्हा मुग्धा हिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तिचा संपर्क झाला नाही. मात्र मुग्धाच्या लंडनमधील मैत्रीण निकिताशी संवाद साधून तेथील पोलिसांशी संपर्क केला असता तिने ऑगस्ट महिन्यात लंडन सोडल्याची मिळाली माहिती. यावरून मुग्धाच्या पालकांनी उच्च आयुक्तांकडे तक्रार केली.

बँक खात्यावरून अंदाज

मुग्धा देशमुख हिने लंडन सोडले. याची माहिती दिली. तिचा फोनही लागत नाही. यामुळे पालकांनी तिच्या बँक खात्यातील व्यवहाराची माहिती घेतली असता, तिच्या खात्यावरून झोमॅटो, बिलंकिट, स्विगी, बुक माय शो, बुक माय ट्रीप, व्हीएफएस वरून ऑर्डर दिल्याची माहिती समोर आली. बिंल्कीटवरून उस्मानपुरा भागातही ऑर्डर मागविल्यावरून पालकांना संशय आला. मुग्धा ही शहरात आली. भेटली नाही. यामुळे संशय वाढला त्यांनी उस्मानपुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.

प्रकरणाची गंभीरतेने दखल

संबंधित प्रकरण गंभीर असल्याने पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज यांनी या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक किरण बोराडे यांच्याकडे दिला. पोलिसांनी तांत्रिक माहितीवरून सदर मुलीचे लोकेशन पिंपरी चिंचवड येथे मिळाले. या माहितीवरून उपनिरीक्षक किरण बोराडे, चालक विलास कराडे व अन्य कर्मचारी पिंपरी चिंचवड येथील शिरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घहुंजे भागातील लोंढा बेलमोंडो येथे पोहोचले. पोलिसांनी मुग्धाच्या रुमची बेल वाजविली असता, प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे पोलिसांनी शिरेगाव पोलिसांची मदत घेत, रुममध्ये प्रवेश घेतला असता, मुग्धा ही मृत अवस्थेत सापडली. या प्रकरणात शिरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.