औरंगाबाद : संरक्षण क्षेत्रातील उपकरणांमध्ये नवीन अत्याधुनिक बदल व्हावेत, या उपकरणाच्या निर्मितीला नवोपक्रमाची जोड मिळावी या उद्देशाने औरंगाबादमधील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘मराठवाडा अ‍ॅक्सिरेटर फॉर ग्रोथ अ‍ॅण्ड इन्क्युबेशन कौन्सिल’ अर्थात ‘मॅजिक’ या संस्थेबरोबर करार करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. संरक्षण क्षेत्रातील उत्पादनातील नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण नवोपक्रम संस्था निर्माण करण्यात आली असून ‘आयडॅक्स’ संस्थेबरोबर संरक्षण क्षेत्रातील उत्पादनात आता औरंगाबादमध्ये वाव निर्माण होण्याची शक्यता आहे. रणगाडय़ांना लागणाऱ्या विद्युत मोटारी, जहाजांमधील विविध प्रकारच्या विद्युत मोटारीचे उत्पादन औरंगाबादमध्ये होते. मात्र आता रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रातील उत्पादनाला चालना देण्यासाठी औद्योगिक संघटना विशेष प्रयत्न करीत आहेत.

हेही वाचा >>> “आधी खिसा कापणारे मग किराणा वाटणारे महाठग आणि…” बच्चू कडूंची राणा दाम्पत्यावर बोचरी टीका!

लातूर येथे येत्या काळात वंदे-भारत रेल्वे गाडय़ांचे उत्पादन हाती घेतले जाणार आहे. हे काम येत्या १४ ते १६ महिन्यांत सुरू होईल. १६०० रेल्वे डब्बे तयार करण्याची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे. त्यामुळे या भागातील उद्योगांना बळकटी मिळणार आहे. केवळ रेल्वे नाही तर संरक्षण क्षेत्रातील उपकरणनिर्मितीसाठी लागणारे तांत्रिक कौशल्य औरंगाबादच्या औद्योगिक वसाहतीमध्ये असल्याने तसेच त्यातील नवोक्रमांना चालना देणारे वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मॅजिक संस्थेकडून विशेष प्रयत्न सुरू होते. या अनुषंगाने बोलताना मॅजिकचे संचालक मििलद कंक म्हणाले, ‘‘सशस्त्र दलाच्या आधुनिकीकरणावर २२० अब्ज खर्च अपेक्षित आहे. आत्मनिर्भर भारत योजनेतून नवोक्रमाला प्रोत्साहन देत नवकल्पना व स्टार्ट अपच्या आधारे काम करता येणे आता शक्य आहे. लघु व मध्यम उद्योगांनाही यातून मोठा लाभ मिळू शकतो. गुजरात येथे होणाऱ्या सरंक्षण उत्पादन प्रदर्शनामध्ये ‘मॅजिक’ व ‘ऑयडॅक्स’बरोबर करार केले जाणार आहेत.’ केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या प्रयत्नांमुळे औरंगाबाद येथील उद्योजक आणि संरक्षण क्षेत्रातील अधिकारी यांच्या दरम्यान नुकतीच चर्चेची फेरी पूर्ण झाली.

हेही वाचा >>> तेव्हा ‘हा’ समंजसपणा कुठे जातो? पुण्याच्या पावसावरून फडणवीसांना पेडणेकरांचा खोचक सवाल; म्हणाल्या, “पुण्याची सत्ता…”

अभियांत्रिकी महाविद्यालयापासून ते लघु उद्योजकांपर्यंत नवीन संरक्षणविषयक कल्पना, असलेल्या संरक्षणविषयक साहित्यामध्ये नवे बदल करण्यासाठी आवश्यक वातावरणनिर्मिती मॅजिक या औद्योगिक संस्थेकडून आता केली जाणार आहे.  नवउद्यमींना प्रोत्साहन देण्यासाठी बीजभांडवल योजनेतही मॅजिक या औद्योगिक संघटनेचा सहभाग आहे. जवळपास १२५०हून अधिक नवउद्यमींच्या कल्पनांचे व्यवसायात रूपांतर होऊ शकते का, असे प्रमाणिकरण करण्यातही या संस्थेने काम केले असून ३२हून अधिक उद्यमींना विविध वित्तीय संस्थांकडून अनुदानही मिळवून देण्यात आले आहे. एखाद्या शहरातून उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक त्या साऱ्या सुविधा निर्माण करण्यापासून ते उद्योजकता वाढीसाठीच्या प्रयत्नांना आता सरकारकडूनही सहकार्य मिळू लागले असल्याचा दावा ‘मॅजिक’कडून केला जात आहे.

नवकल्पना आणि उद्योग उभारणीत खूप सारे टप्पे असतात. कल्पनांचे व्यावसायिक रूपांतरण केल्यानंतर उत्पादन घेण्यापूर्वीच्या तांत्रिक बाबी, उत्पादनाचा प्रोटोटाईप, व्यावसायिक मूल्यमापन, सहकार्याचा अवकाश,  व्यवसाय सल्लागार, निधीचे व्यवस्थापन, सामित्व हक्क, ट्रेड मार्किंग तसेच जलद विकासवृद्धी या प्रत्येक टप्प्यावर उद्योजकांना मार्गदर्शन करण्याचे काम मॅजिकच्या वतीने केले जाते. आता त्याला यश मिळत आहे. आता संरक्षणासारखे क्षेत्रही औरंगाबादमध्ये खुले होऊ शकणार असल्याने त्याचा अधिक फायदा होईल.

 – आशीष गर्दे, संचालक, मॅजिक