नांदेड : माहूर येथील श्री दत्त शिखर संस्थानचे महंत मधुसूदनजी भारती गुरु अच्युत भारती महाराज (वय ९५) यांचे शनिवारी सायंकाळी देहावसान झाले. दिवंगत महंत अच्युत भारती महाराज यांच्यानंतर १९७८ मध्ये विधिवत प्रक्रियेनुसार महंत मधुसूदनजी भारती महाराज हे श्री दत्तशिखर संस्थानच्या गादीवर विराजमान झाले होते. तब्बल ४ तप म्हणजे ४८वर्षे त्यांनी गादीवर राहून तप:साधनेत जीवन व्यतीत केले.
अशोक चव्हाण यांच्याकडून शोक
दरम्यान महंत मधुसूदनजी भारती (मालक) महाराज यांचे देहावसान झाल्याचे वृत्त मन सुन्न करणारे आहे. त्यांच्या निधनामुळे आध्यात्मिक क्षेत्रातील एक दीपस्तंभ हरपला आहे. गेल्याच आठवड्यात मी त्यांचे दर्शन घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. एक थोर विचारवंत आणि मार्गदर्शक हरपले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
माहूर बंदचा निर्णय
महंत मधुसूदन भारती महाराज यांना श्रद्धांजली म्हणून रविवारी माहूर शहर पूर्ण दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदला व्यापारी, विविध संस्था, संघटना तसेच नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पाठिंबा दर्शविला असून सर्वांनी बंद पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मेणा सवारीचे आकर्षण
दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ पर्वणी काळात महंत महाराजांची पारंपरिक ‘मेणा सवारी’ ही भाविकांसाठी विशेष आकर्षण व श्रद्धेचा केंद्रबिंदू होती. या सवारीद्वारे ते माहूरगडावरून भोकर तालुक्यातून बासरपर्यंत आणि पुन्हा नांदेड जिल्ह्यात प्रवास करत असत. शुक्ल पक्ष दशमीच्या दिवशी गोदावरी तीरावर अभ्यंग स्नान करून पूजा-अर्चा केल्यानंतर ते पुन्हा माहूरगडाकडे प्रस्थान करत असत. हा धार्मिक प्रवास भाविकांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जात होता.
जीवनशैलीत साधेपणा
महंतजींच्या जीवनशैलीत साधेपणा व परंपरेचे काटेकोर पालन दिसून येत असे. त्यांनी कधीही वाहनाचा वापर केला नाही. मेणा सवारीत भोई समाजातील बांधव खांद्यावर मेणा वाहून नेत असत. सुमारे १६ भोई बंधू हा मेणा नांदेडपर्यंत घेऊन जात व परत आणत असत. दररोज १२ ते १४ किलोमीटरचा पायी प्रवास करत सार्वजनिक ठिकाणी मुक्काम करणे ही या यात्रेची वैशिष्ट्ये होती. महंत मधुसूदन भारती महाराज यांच्या निधनाने एक अध्यात्मिक परंपरेचा दीप विझला असून त्यांच्या स्मृती भाविकांच्या मनात कायम जिवंत राहतील.
