छत्रपती संभाजीनगर : निर्यातीसाठी इराणमधील ‘बंदर अब्बास’ नावाचे बंदर आता व्यवहारासाठी बंद झाल्याने महाराष्ट्रातून उजबेकिस्तान, अफगाणीस्तानसह आखाती देशातील सर्व कृषीमाल मुंबईतील बंदरामध्ये अडकून पडला आहे. अनेक गाड्यांमध्ये भरलेला माल पुन्हा उतरवून घ्यावा लागला असून कृषीमाल निर्यातीला मोठा फटका बसला आहे.

विशेषत: काबुली चना, तूर, सोयाबीन पेंड, कांदा बियाणे आदींवर मोठा परिणाम होईल असे व्यापारी आणि उत्पादक सांगत आहेत.
लातूर येथील कृषीमाल निर्यातीसाठी माहेश्वरी ॲग्रोचे संचालक श्रीहरी कलया म्हणाले, मराठवाड्यातून काबुली चना, तूर, सोयाबीनची पेंड, चना, थोड्या प्रमाणात तूर, मका निर्यात होत असे. आता जवळपास ८०० मेट्रीक टन माल बंदरात अडकला आहे.

सध्या तरी माल वाहतूक पूर्णत: थांबली आहे. त्यामुळे मुंबईतील बंदरावर नव्याने माल पाठविण्यासाठी आवश्यक ती जागाच उपलब्ध नाही. सगळा माल एका जागीच थांबला आहे. नशिबाने माल जहाजावर चढून त्याचा प्रवास सुरू नव्हता. मात्र, आता ही बाजारपेठ कधी सुरू होईल हे सांगता येत नाही. त्यानंतर माल वाहतुकीचे दरही वाढत जातील. इंधनाचे दर वाढले की व्यापार अधिक उणे होत जाईल असे दिसत आहे.

अनेक देशात माल पाठविण्यासाठी इराणच्या बंदराचा वापर होत असे. आता ते सारे बंद झाले कृषी निर्यातदार हैराण आहेत. संयुक्त अरब अमिरातीमध्ये महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात आयात होते. खांडसरी साखर, २८.५ स्टेपल लांबी असणारा कापूस, बासमती तांदुळ, सरकी, यासह अगदी बाबींची निर्यात होते. त्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

संयुक्त अरब अमेरातीमधील बंदरे ही पुन्हा माल वितरित करण्याचे केंद्र मानले जाते. विशेषत: अमेरिकेने लावलेल्या शुल्कानंतर महाराष्ट्रातील बहुतांश व्यापारी विशेषत: वाहन उत्पादक आणि वाहनाचे सुटे भाग उत्पादक या बंदराचा ‘ मधला’ टप्पा म्हणून संयुक्त अरब अमिरातीचा उपयोग करतात. त्यामुळे निर्यातीवर मोठा परिणाम होईल असे मानले जात आहे.