परभणी: राज्यात संतुलित, सर्वांगीण आणि गतिमान विकासासाठी आकांक्षित जिल्हा व आकांक्षीत तालुका कार्यक्रमाचा आता विस्तार करण्यात आला असून राज्यातल्या सहा नव्या जिल्ह्यांसह १५० आकांक्षीत तालुक्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. या संदर्भातला शासन निर्णय आज सोमवारी (दि.२०) निर्गमित करण्यात आला आहे. दुर्लक्षित व मागास भागांच्या विकासासाठी आधीच मानव विकास मिशन सारखी योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेलाही अर्थसंकल्पीत तरतुदीपेक्षा कमी रक्कम मिळत असताना आता पुन्हा या नव्या आकांक्षीत जिल्हा व तालुका कार्यक्रमाने काय साध्य होणार तसेच यापुढे मानव विकास मिशनचे अस्तित्व काय असाही प्रश्न आता निर्माण झाला आहे.
नीती आयोगाने देशातल्या सर्वाधिक दुर्लक्षित व मागासलेल्या ११२ जिल्ह्यांचा झपाट्याने कायापालट करण्यासाठी जानेवारी २०१८ मध्ये आकांक्षीत जिल्हा हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमांतर्गत राज्यातल्या नंदुरबार, धाराशिव, वाशिम, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. या कार्यक्रमात संबंधित जिल्ह्यातले २७ तालुके समाविष्ट करण्यात आले होते. आरोग्य व पोषण, शिक्षण, कृषी आणि संलग्न सेवा, मूलभूत पायाभूत सुविधा, सामाजिक विकास या क्षेत्रातील ४० प्रमुख कार्य निर्देशांकाच्या आधारे त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात येते आणि कामगिरीच्या आधारावर विशेष निधी संबंधित तालुक्यांना नीती आयोगाकडून देण्यात येतो.
या कार्यक्रमात आता नव्याने हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे, परभणी या सहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. पूर्वीच्या व आताच्या एकूण दहा जिल्ह्यातले ७७ तालुके आणि उर्वरित जिल्ह्यातले १०० आकांक्षीत तालुके यांचा गतिमान विकास करण्यात येणार आहे. या संदर्भात १३ एप्रिलला मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्यासंबंधीचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला.
यापूर्वी २००६ मध्ये राज्य सरकारने मानव विकास मिशनच्या माध्यमातून १२५ तालुक्यांमध्ये आरोग्य, शिक्षण, उत्पन्न वाढीच्या योजना हाती घेण्याचा कार्यक्रम आखला होता. या प्रकल्पाला निर्धारित अर्थसंकल्पित तरतुदीप्रमाणे निधी कधीच मिळाला नाही. मागास १२५ तालुक्यांमध्ये शालेय विद्यार्थिनींसाठी मोफत बस सायकल यासारख्या योजना प्रामुख्याने राबवण्यात आल्या. तालुकास्तरावर बालभवन विज्ञान केंद्र सुरू करण्याची योजनाही निर्माणाधीन होती. मानव विकास मिशनच्या माध्यमातून मुलांचे आरोग्य, गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी यासारखे उपक्रम हाती घेतले गेले. मात्र ‘लाडकी बहीण’ सारख्या योजनेमुळे मानव विकास मिशनसाठी अर्थसंकल्पीत तरतुदींप्रमाणे निधी मिळण्यास अडचण येत असल्याची बाब गेल्या वर्षीपासून स्पष्ट झाली. या पार्श्वभूमीवर आता आकांक्षीत जिल्हे व तालुक्यांची यादी सरकारने नव्याने जाहीर केली आहे. यासाठी निधीच्या तरतुदीचे काय आणि या नव्या कार्यक्रमामुळे आता मानव विकास मिशनचे अस्तित्व काय असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
