छत्रपती संभाजीनगर : बिअर भरण्यासाठी आवश्यक असणाऱ्या काचेच्या बाटल्यांच्या उत्पादनात गॅस तुटवड्यामुळे मोठ्या अडचणी आल्या. तरी बिअर विक्री आणि राज्य उत्पादन शुल्कात गेल्या दोन महिन्यात वाढ दिसून आली आहे. मात्र, हे करताना बहुतांश बिअर कंपन्यांनी बिअरच्या विक्री किंमतीमध्ये पाच रुपयांची वाढ केली आहे. मे महिन्यातील उन्हाचा कडाका पाहता बिअर विक्रीत वाढ होईल असे मानले जात होते. गॅस तुटवड्यामुळे आलेल्या सर्व संकटांवर मात करत एप्रिल आणि मे महिन्यातील राज्य उत्पादन शुल्कामध्ये तब्बल १११ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
औद्योगिक वसाहतीचा द्रवरुप नैसर्गिक वायू पुरवठा अचानक बंद पडल्याने वाहन उद्योगावर मोठे संकट आले. तसेच बिअर बाटल्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम होईल असा दावा करण्यात आला होता. ‘ कॅनपॅक ’ या बाटली आणि ‘ कॅन ’ उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या कंपनीने किमान भट्टी बंद करण्यापर्यंत तरी गॅस पुरवठा सुरू ठेवावा अशी मागणी केली होती. अचानक गॅसपुरवठा बंद केल्यास काच वितळविण्याच्या भट्टीमध्ये स्फोट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. याचा मोठा परिणाम वितरणावर होईल असे मानले जात होते. काही दिवसाच्या फरकाने भट्टीचा एक भाग बंद करुन उत्पादन सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. काचेच्या बाटल्याची किंमत आणि टीनचे भाव वाढल्याने बिअर किंमतीमध्ये वाढ करू देण्याची विनंती बिअर उत्पादन कंपन्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे केली होती. त्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक अभिनव बालुरे यांनी दिली.
बिअर उत्पादनातील बहुतांश सर्व कंपन्यांनी त्यांच्या बॅन्डमध्ये पाच रुपयांची वाढ केली आहे. गेल्या महिनाभरात उत्पादनावर फारसा परिणाम दिसत नाही. मात्र, विक्री किंमत वाढली आहे. यामध्ये रॉयल चॅलेजचे कॅन, हेवर्डस् स्ट्रॉग, ट्युबर्ग, कांगारुच्या विविध छोट्या आणि विविध आकारातील बिअरच्या किंमतीमध्येही पाच रुपये वाढविण्यात आले आहेत. यामध्ये काल्सबर्गच्या विविध प्रकारच्या तीन बिअरच्या यात समावेश आहे. वाढलेल्या किंमती, डिझेलचे वाढत जाणारे दर यामुळे सर्व क्षेत्रात वस्तू महागल्या आहेत. त्यात आता बिअरच्या पाच रुपयांची भर पडली आहे. मात्र, राज्य उत्पादन शुल्कात या दोन महिन्यात मोठी वाढ दिसून आली आहे. गेल्या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात ६४८ कोटी रुपये मिळाले होते. गेल्या दोन महिन्यात १११ कोटी रुपयांची भर पडली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी एप्रिल व मे महिन्यात ७७९ कोटी रुपये मिळाले असल्याचे अभिनव बाेलुरे म्हणाले.
‘‘ वेगवेगळया कारणांमुळे उत्पादन खर्चात वाढ झाल्याचे अहवाल कंपन्यांनी दिले होते. साधारणत: प्रतिलिटर दीड रुपयांपर्यंतही वाढ होती. यावर २३५ टक्के शुल्क आकारण्याचे सूत्र ठरलेले आहे. परिणामी बिअरच्या किंमतीमध्ये पाच रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यात बिअर विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात २० टक्के वाढ झाली आहे.
बिअरचे वाढलेले राज्य उत्पादन शुल्क
बिअर कंपनीचे नाव वर्ष वर्ष
२०२५ – २६ २०२६ – २०२७
१. युबी मिलेनियम १०७.३५ २००.६६
२. यु. वी .अजिंठा ६१.०६ ८१.०७
३. काल्सबर्ग इं. लि. १७६ १५१
४. एवीएन वेव पाल्स १३३.०७ ११०.३०
५. लिलासन्स इंड १२९.३८ १०५.७९
६ अे.वी. एन बेव फॅास्टर ४१.४८ १३१.००
एकूण ६४८.६५ ७७९.९६ ( सर्व आकडे कोटींमध्ये )
