छत्रपती संभाजीनगर: निर्यात मालावर अमेरिकेमध्ये लावण्यात आलेल्या शुल्कामुळे राज्यातील निर्यातदारांच्या मनात चलबिचल असली तरी २०२४ – २५ मध्ये राज्यातील निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत स्थिर असल्याचे दिसून येत आहे. एकूण पाच लाख ५७ हजार २७१ कोटी रुपयांची निर्यात झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात केवळ ८७१ कोटी रुपयांची वाढ दिसत आहे. मात्र, रकमेमधील ही वाढ रुपयाच्या अवमूल्यनामुळे दिसत असल्याचे सांगण्यात येते. निर्यात उत्पादकांमध्ये मोठी चलबिचल आहे. निर्यातीचे हे आकडे पुढील काही महिन्यांत झपाट्याने खाली येतील असे सांगण्यात येत आहे.

व्यापार अन्वेषण आणि सांख्यकीय महासंचालकांच्या कार्यालयाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील निर्यात वस्तू आणि त्याचे प्रमाण याचा एक अहवाल तयार केला असून त्यानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत निर्यातीचे आकडे स्थिर दिसून येत आहेत. अमेरिकेस होणाऱ्या निर्यातीवर गेल्या चार महिन्यांपासून मोठा परिणाम झाला आहे. राज्यातील सहा महसूल विभागनिहाय निर्यातीतून झालेली व्यापार उलाढाल फारशी वाढलेली नाही. मात्र, त्यात घट दिसून येत नाही. यास मुंबई अपवाद आहे.

राज्यातील एकूण निर्यातीमध्ये मुंबई व एमएमआरचा वाटा दोन लाख ८ हजार ६२१ कोटी रुपये एवढा असून देशाच्या एकूण निर्यातीमध्ये तो १५.३७ टक्के एवढा आहे. तो २०२४ मध्ये काहीसा घटला आहे. तो आता दोन लाख १०६ कोटींवर गेला आहे. ही घट आठ हजार ५१५ कोटी रुपयांनी कमी झाली आहे. मुंबई जिल्ह्यातही निर्यातीमध्ये घट दिसून आली असून १ लाख १० हजार ३३८ कोटीवरून ती ९२ हजार १०४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हे प्रमाण राज्याच्या निर्यातीमध्ये शेकडा १९.८३ वरून १६.५२ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. तुलनेने मागास मानल्या जाणाऱ्या मराठवाड्यासारख्या भागातून मात्र हे प्रमाण वाढले असून ती वाढ २६१७ कोटी रुपयांनी वाढलेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निर्यातीबाबतचे आकडे आणि गेल्या चार महिन्यांत सुरू असणाऱ्या घडामोडी यात मोठी तफावत आहे.

निर्यातीचे आकडे २०२३ -२४ आणि २०२४ -२५

(विभागाचे नाव निर्यात कोटी रुपयांमध्ये)

  • मुंबई : १,१०,३३८.०१ ९२१०४.४२ (१६.५२ )
  • मुंबई एमएमआर : २०८६२१ २००१०६ .३४ ( ५.६७ )
  • पुणे विभाग : १३२१८२ १ ४० ४७७ ( २५.२१ )
  • नागपूर : १७४९७ २२६२७ ( ४.०६ )
  • अमरावती : २१९० २०१७ ( ०. ३६)
  • नाशिक : ३००२० ३१६४१ (५.६७ )
  • छत्रपती संभाजीनगर : २६६२२ २८६२६ ( ५.१४ )
  • कोकण : १३९२६७ १३१७७५ ( २३.६५ ) ( कंसातील आकडे एकूण निर्यातीमधील शेकडा प्रमाणाचे )

कोणत्या देशात निर्यात?

महाराष्ट्रातून २१ टक्के निर्यात अमेरिकेमध्ये होते. संयुक्त अरब अमिराती, युरोपीय देश, बेल्जियम, जर्मनी, मेक्सिको, नॅदरलँड या देशांत अलंकार व मौल्यवान वस्तू २१ टक्के, इलेट्रॉनिक्स वस्तू १९ टक्के, अभियांत्रिकी यंत्र सामग्री ११ टक्के, औषधे सहा टक्के, कृषिमाल- फळे सहा टक्के, वस्त्रप्रावरणे सहा टक्के अशी निर्यात होते आहे.

निर्यातीच्या क्षेत्रात सध्या चलबिचल आहे. गेल्या वर्षीच्या आकड्यांमध्ये फारशी वाढ नसली तरी ते काहीसे स्थिर आहेत. रुपयाच्या अवमूल्यनामुळे एकूण रकमेमध्ये काहीशी वाढ दिसत असेल. पण निर्यातीचा वेग स्थिर म्हणता येईल असाच आहे. आता अमेरिकेच्या नव्या शुल्कवाढीनंतर चलबिचल असली तरी सध्याची अस्वस्थता आणखी काही दिवसाने आकड्यांच्या रूपात पुढे येईल. नव्या देशांमध्ये माल पोहोचविण्याचे पर्यायही स्वीकारले जात आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यातून होणारी निर्यात स्थिर म्हणता येईल.

-उमेश दाशरथी, उद्योजक, महाराष्ट्र चेंबर्सचे माजी अध्यक्ष

वाहन उद्योगांमध्ये निश्चितपणाने चलबिचल आहे. नवे पर्याय शोधले जात आहेत. गेल्या वर्षीचे आकडे स्थिर आहेत. पण काही शहरांमधून निर्यातीमध्ये वाढ दिसून आली आहे. आफ्रिकेतील काही देशांमध्ये दुचाकीचा व्यवसाय वाढला आहे. केवळ वाहन नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रांत एक सावध भूमिका असल्याचे दिसून येत आहे. मात्र, गेल्या वर्षी निर्यात काहीअंशी स्थिर राहिली.

– राम भोगले, उद्योजक