छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीस सुरूवात झाली असून राज्य सरकारने ५०२९ कोटी रुपयांचा पहिला हप्ता बँकांकडे सुपूर्द केला असल्याचे बँकेतील सूत्रांनी सांगितले. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ३१ लाख ५० हजार कोटी रुपयांपर्यंतची पीक कर्जमाफी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

कोणते शेतकरी कर्जमाफीत पात्र ठरतील हेही बँकांनी ठरविल्यानंतर १६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा हप्ता देण्याचे ठरविण्यात आले. या यादीतील सहा लाख २६ हजार शेतकऱ्यांना पाच हजार २९ कोटी रुपयांचा हप्ता मंजूर करून तो बँकेकडे वळविण्यात आला आहे. त्यामुळे उद्यापासून कर्ज खाते शून्यावर येतील आणि पुढील पीक कर्ज मिळण्यास सुरुवात होईल असे सांगितले जात आहे.

शेतकऱ्यांची कर्जमाफीमध्ये बँकाचा ‘हेअर कट’ अधिक असल्याने कर्जमाफीबाबत संभ्रम निर्माण होऊ लागले होते. मात्र, शेतकऱ्यांचे कर्जखाते शुन्यावर आणून त्यांना नव्याने पीक कर्ज देण्याचा मार्ग मोकळा करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून स्पष्ट केले होते. आता केवायसी करुन पीक कर्ज खाते शुन्यावर आणले जाईल आणि नवी कर्जमागणी मंजूर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अद्यापि जिल्हानिहाय यादी प्रकाशित झाली नाही. मात्र, पहिला हप्ता बँकाकडे वर्ग करण्यात आला आहे.

राज्य सरकारची ही तिसरी कर्जमाफी आहे. यामुळे शेतकऱ्यांचा मोठा भार कमी होईल असा दावा केला जात आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पुन्हा हवामान बदलाचा मोठा फटका जाणवू शकतो, अशी चिन्हे असल्याने ही कर्जमाफी अधिक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

राष्ट्रीयीकृत बँक – १२; बँक खाते – १५ लाख ९९ हजार ४४

जिल्हा मध्यवर्ती बँक – ३०; बँक खाते – १० लाख ७४७

खासगी बँक – १०; बँक खाते – ४६ हजार ९८९

महाराष्ट्र ग्रामीण बँक – १; बँक खाते – ४ लाख ७० हजार ६१९

एकूण बँक – ५३; एकूण बँक खाते – ३१ लाख २४ हजार