छत्रपती संभाजीनगर – पिकते तिथे विकत नसते, अशा अर्थाची एक म्हण सर्वश्रुत असून, त्याची प्रचिती मत्स्योत्पादनातून समोर आली आहे.केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने नुकतीच २०२४-२०२५ ची ‘मत्स्य सांख्यिकी’ अहवाल पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. सागरी मत्स्योत्पादना संदर्भातील माहिती ही प्रामुख्याने केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था (कोची), भारतीय मत्स्य सर्वेक्षण संस्था (मुंबई) तर गोड्या पाण्यातील मत्स्योपादना संदर्भातील आकडेवारी केंद्रीय अंतर्देशीय मत्स्य संशोधन संस्था (बराकपूर, प. बंगाल) व संबंधित राज्य सरकारच्या मत्स्यव्यवसाय खात्याच्या मदतीने तयार केली जाते. त्यात महाराष्ट्रात सागरी मत्स्योत्पादन देशाच्या एकूण उत्पादनाच्या तुलनेत १२ टक्के आहे. उत्पादनाच्या रांगेत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असला तरी त्याआधी पहिले स्थान गुजरातचे, दुसरे तामिळनाडूचे व केरळ तिसऱ्या स्थानी आहे. मत्स्याहारात तर महाराष्ट्र मागेच आहे.

सांख्यिकीतील नोंदी

मत्स्य सांख्यिकी अहवालात आकडेवारीसह मत्स्योत्पादनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या नोंदी आहेत. त्यात राज्यातील दरडोई मत्स्यआहाराचे (२०२४-२५) प्रमाण ५ किलो नोंदले गेले आहे. यापूर्वी २०२१- २०२२ या वर्षात दरडोई ३ किलो एवढे होते. सर्वाधिक मत्स्यआहार त्रिपुरा (२८.५१ किलो) तर अत्यल्प मत्स्यआहार करणारे राज्य हरियाणा (०.३ किलो) ठरले आहे.

मत्स्याहार न आवडे राज्याला

देशाच्या एकूण मत्स्योत्पादनात राज्याचा सिंहाचा वाटा असला तरी मत्स्य आहाराबाबत लोकांचा विशेष रस दिसून आला नाही. महाराष्ट्रातील गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनात आकडेवारी अगदीच नगण्य म्हणजे १.८ टक्के असल्याचे समोर आले आहे. राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन हे अत्यल्प असून ते देशातील पहिल्या प्रमुख दहा राज्यांमध्येही दिसून येत नाही.

मच्छिमारीशी संबंधित

राज्यात किनाऱ्यालगत ५२६ मच्छिमारांची खेडी असून लगतच्या १७३ ठिकाणी माशांची समुद्रातून आवक होते. यात ससून डॉक, भाऊचा धक्का, सातपती, वर्सोवा, मालवण, अलीबाग या मुख्य ठिकाणांचा यात समावेश होतो. राज्यातील सागरी मत्स्योत्पादनात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा महत्त्वाचा वाटा असून राज्यात बोंबील, हिल्सा, बांगडा व तारली ही सर्वाधिक सापडणारी मत्स्य प्रजात असून यात कोळंबी फक्त ६ टक्के आढळते तर उल्लेखनीय बाब म्हणजे राज्यात मासेमारी व संबंधित व्यवसायात महिलांचे प्रमाण ४७ टक्के एवढे आहे.

सागरात आढळणारे मत्स्य

सागरी मासेमारीसाठी प्रामुख्याने यांत्रिक ट्रॉलर, गिलनेटर, पर्स सेईनर, मोटारनौका व पारंपारिक नौकाही वापरल्या जातात तर मासे पकडण्यासाठी डोल नेट, बॅग नेट, पर्स सेईनर, गिल नेट व ट्रॉल जाळयाचा वापर होतो. राज्यातील गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनात प्रामुख्याने कतला, रोहू व म्रिगल ही भारतीय तर कार्प, कॉमन कार्प, ग्रास् कार्प व सिल्व्हर कार्प सारखी विदेशी मासे अन् काही प्रमाणात स्थानिक मत्स्यजाती आढळतात.

बोंबीलविषयीची काय माहिती

सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारा जवळपास ९९ टक्के बोंबील मासा हा गुजरात व महाराष्ट्रात सापडतो. २०१३-१४ च्या ९५.७९ लाख टनाच्या तुलनेत देशातील २०२४-२५ सालातील १९७.७५ लाख टन मत्स्योत्पादनात १०६ टक्क्यांनी वाढ नोंदली गेली आहे.