छत्रपती संभाजीनगर – राज्यातील नोंदणीकृत व अन्य लहान-मोठ्या क्षेत्रातील गोशाळांची संख्या एक हजारांवर गेलेली अ्सून, याअंतर्गत दीड लाखांवर गोधन आश्रयात आहे. त्या माध्यमातून पंचगव्यासह खत निर्मिती, आैषधी, सौंदर्यप्रसाधनामध्ये वापरण्यात येणाऱ्या वस्तुंचे उत्पादन घेतले जात असले तरी शेणातून गोबर (बायोगॅस) गॅस निर्मितीचा मार्ग असतानाही जेमतेम गोशाळांमध्येच हा प्रकल्प सुरू असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे गोशाळांना घसघशीत अनुदानही राज्य शासनाकडून मिळते आहे.
जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीत इंधनाची समस्या निर्माण झाली आहे. हाॅटेल व्यावसायिकांना सिलिंडर मिळवण्यासाठी आटापिटा करावा लागत आहे. दरही नुकतेच २०० रुपये सिलिंडरमागे वाढले आहेत. घरगुती ग्राहकांच्याही रांगा अजूनही स्थानिक एजन्सीजपुढे दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत २०० गोधन असणाऱ्या गोशाळांमध्ये बायोगॅसच्या उभारणीला प्राधान्य दिले असते तर त्यातून दिवसभरात १०० जणांचा स्वयंपाक साधता आला असता, असेही एक चित्र मांडले जाऊ लागले आहे. यामध्ये गोशाळा या गावाबाहेर असल्याने तेथील प्रकल्पातून गॅस पोहोचवण्याचा आणि साठवणुकीचा पर्याय उपलब्ध नसल्याने बायोगॅससाठी प्रयत्न होत नसल्याचे सांगितले जात आहे.
राज्यात नोंदणीकृत ९६८ तर एकूण मिळून १ हजार ७० गोशाळा आहेत. त्यातील हंबीरराव मोहिते गोशाळा (पुणे), कामधेनू (सोलापूर), लहानुजी महाराज संस्थान (आर्वी-वर्धा), गोकुलम गोरक्षण (अमरावती), शिवशक्ती गोशाळा (रासेगाव-अमरावती), जगदिश बाबा गोरक्षण, गोविज्ञान अनुसंधान (देवलापूर-नागपूर), आर. सी. बाफना (जळगाव), श्रीकृष्ण गोशाळा (पारडगाव-जालना) व अन्य काही ठिकाणी बायोगॅस प्रकल्प आहेत. बाफना गोशाळेत अडीच हजार गोधन असून, त्यांच्याकडे ५५ घनमीटरचा प्रकल्प असून, तेथे दररोज २०० जणांचे जेवण जनरेटरही चालते. एके ठिकाणचा एक कोटींचा प्रकल्प पूर्ण झालेला आहे. परंतु काही स्थानिक अडचणींमुळे थांबला आहे. – उल्हास बाेराळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, गोशाळा महासंघ.
सध्या बाजारात भात्त्यासारख्या हवा सोडणाऱ्या बॅटऱ्यांवरील शेगड्या मिळत आहेत. त्यासाठी गौऱ्यांची आवश्यकता भासते असल्याने मागणी वाढली आहे. सध्या सहाशे रुपये शेकड्यांनी गौऱ्यांच्या पोत्याची विक्री गोशाळेतून होत आहे. बायोगॅस प्रकल्प उभारणीचे काम प्रस्तावित असून, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बायोगॅसमध्ये रिफिलिंगचा पर्याय नसल्याची अडचण आहे. – माणिक रासवे गुरुजी, गोशाळा संचालक, रामेटाकळी.
सेनगाव तालुक्यातील हत्ता ग्रामपंचायतच्या योजनेतून आमच्या गोपाल गोशाळेत २० लाख रुपये खर्चातून बायोगॅस प्रकल्प गतवर्षीपासून सुरू करण्यात आलेला आहे. चार टोपले शेणातून प्रकल्प चालतो. त्यावर दिवसभराचा स्वयंपाक, चहा-पाणी चालते. बाहेर पडणारी स्लरीही खत-शेती आैषधांच्या निर्मितीसाठी कामी येते. – शिवाजीराव गडदे-हत्तेकर, सेनगाव.
४५ वर्षांपासून कोकर कुटुंबात तीन बायोगॅस आहेत. आपल्याकडे सकाळी व सायंकाळी मिळून २० सदस्यांचा स्वयंपाक तीन शेगड्यांवर केला जातो. विशेष म्हणजे गॅस सुरू राहिला तरी स्फोटासारखा धोका नाही. स्लरीचा उपयोग शेतीत खतासाठी होतो. – श्यामभाऊ कोकर, मानवत.
