छत्रपती संभाजीनगर : कारागृह विभागातील समाजमाध्यमप्रेमी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर नवे बंधन आले आहे. त्यांना गणवेष परिधान करून कुठलेही गाणे म्हणणे, वर्दीत समाजमाध्यमावर सक्रिय राहाता येणार नसून, साध्या वेषातही (सिव्हिल ड्रेस) ‘सभ्य’ता जपावी लागणार आहे. या आदेशामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात असल्याची कुजबूज सुरू झाली आहे.
गृहविभागाच्या कारागृह व सुधारसेवा विभागाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक सुहास वारके यांनी १ जुलै रोजी उपरोक्त आशयाचे एक पत्र काढले आहे. या पत्रात अधिकारी, कर्मचाऱ्यांना, बंद्यांना आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक देतात. हे कृत्य महाराष्ट्र कारागृह नियमावली १९७९ मधील प्रकरण १३, स्टाफ डिसीप्लिन भाग-२ मधील क्रमांक ८ चे उपनियम-३ चा भंग करणारे आहे.
यासंदर्भाने असे निदर्शनास आले आहे की, काही अधिकारी व कर्मचारी गणवेषावर दाग-दागिने, चेहऱ्याची रंगभूषा (मेकअप), विविध प्रकारचे गाॅगल्स, गणवेषामध्ये समाविष्ट नसलेले बूट घालतात. असे करणे गणवेषधारी अधिकारी, कर्मचारी यांनी टाळावे. कारण यामुळे त्यांची वैयक्तिक व व्यावसायिक तसेच कारागृहाची प्रतिमा मलीन होते. या नव्या नियमांचे उल्लंघन झाल्यास शिस्तभंग कार्यवाही करण्यात येईल.
या पत्रामुळे कलावंत अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून, देशप्रेमाची गाणे म्हणणे, वाद्य वादन कलेसह इतरही कलावंतांना सादरीकरण करता येणार नसून वर्दी, गणवेष ही ओळख नसेल तर कलावंताची माहितीही होणार नाही, असा सूर उमटू लागला आहे.
या संदर्भात कारागृह व सुधारसेवा विभागाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक सुहास वारके यांच्याशी संपर्क साधला. मात्र, कुठलाही प्रतिसाद मिळू शकला नाही. शिवाय कारागृह विभागाशी संबंधित एका उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.