छत्रपती संभाजीनगर – राज्यातील शासकीय लेखन सामग्री ग्रंथागार कार्यालयातील अत्यंत माफक दरात आणि माहितीपूर्ण उपलब्ध ग्रंथ खरेदीची इच्छा ग्रंथप्रेमींना पूर्ण करता येत नाही. ग्रंथागारांमध्ये खरेदीची व्यवस्था रोखीनेच असल्यामुळे ग्रंथप्रेमींची चांगलीच अडचण होत आहे. परिणामी ग्रंथागारांमधील ग्रंथ विक्रीवरही परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

सध्या खरेदीचे सर्व व्यवहार हे यूपीआयच्या प्रचलित झालेल्या पद्धतीनेच होत आहेत. पाच रुपयांपासूनच्या एखाद्या पाकेटापासून ते चहापर्यंत किंवा भाजी, भंगारवाल्यांकडचेही व्यवहार यूपीआयद्वारेच होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, वाई, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर येथील शासकीय लेखन सामग्री ग्रंथागारांमधील भारतीय संविधान, विविध जिल्ह्यांचे गॅझेटियर, मान्यवर लेखकांचे गौरवपरग्रंथ, शब्दकोश, भाषा कोश, ऊर्दू-मराठी शब्दकोश, महापुरुषांचे चरित्रग्रंथ, ऐतिहासिक संदर्भांचे लेखन झालेले ग्रंथ अत्यंत माफक दरात उपलब्ध असूनही केवळ रोखीनेच खरेदी करण्याची व्यवस्था असल्यामुळे ग्राहक, ग्रंथप्रेमी परत जात असल्याचे चित्र आहे.

सध्याच्या मोबाईल फोनच्या स्क्रीनिंग दुनियेतील आभासी वातावरणाच्या मोहात अडकलेली तरुणाई, बच्चे कंपनी आणि काही ज्येष्ठ मंडळीही पुस्तके वाचत नसून, वाचन संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याचे चित्र असताना ग्रंथ खरेदीच्या इच्छेपोटी ग्रंथागारांमध्ये आलेल्या ग्राहकाला माफक दरात पुस्तक विकत घ्यायचे असेल तर त्याच्यासाठी यूपीआयची सुविधा उपलब्ध असणे गरजेचे असल्याचे मत एका ज्येष्ठ व्यक्तीने व्यक्त केले.

जिल्ह्यांच्या गॅझेटियरचा तुटवडा

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय लेखन सामग्री ग्रंथागारामध्ये विविध जिल्ह्यांचे माहिती कोश (गॅझेटियर) – अधिकृत संदर्भ ग्रंथ सध्या उपलब्ध नाहीत. केवळ नांदेड, परभणी, जळगाव, नागपूर, लातूर आदी जिल्ह्यांचेच गॅझेटियर ग्रंथ उपलब्ध आहेत. छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, हिंगोली यासह अनेक जिल्ह्यांच्या गॅझेटिअरच्या मुद्रित प्रतींचा तुटवडा असल्याचे चित्र आहे.

नवीन ग्रंथ छपाईची एक स्वतंत्र व्यवस्था असते. त्यानुसार आलेले छपाईचे काम येथून केले जाते. सध्या खरेदीसाठी आलेला ग्रंथप्रेमी व्यक्ती ऑनलाईन खरेदीच्या सुविधेअभावी परतत आहे. त्यासाठी आम्ही यूपीआयसारखी ऑनलाईनची खरेदीची व्यवस्था सुरू करण्यासाठी पाठपुरावा करत आहोत. – पु. सु. वाघमारे, सहायक संचालक, शासकीय ग्रंथागार.