छत्रपती संभाजीनगर :  दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्यातील ऑरिक सिटीमध्ये सौरपटल निर्मिती करणार्‍या ‘एलएनके ग्रीन’ कंपनीस शेंद्रा औद्योगिक वसाहतीत ६३ एकर जागा देण्याच्या हालचाली वेगात सुरू आहेत. राज्यात ४७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करत असलेल्या या कंपनीत माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा पुत्र भागीदार आहे. याविषयी स्पष्टीकरण देताना भागवत यांनी आपल्या मुलाच्या भागीदारीमुळे गुजरातला चाललेला प्रकल्प महाराष्ट्राला मिळाल्याचे म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या २०२१ ते २०२४ या कार्यकाळात अर्थ राज्यमंत्री राहिलेले डॉ. भागवत कराड यांनी जायकवाडी धरणाच्या पाण्यावर सौरपटल उभारून १ हजार ३४१ मेगावॉट वीजनिर्मिती करणार्‍या प्रकल्पाचे जोरदार समर्थन केले होते. त्यांचेच पुत्र वरुण कराड हे ‘एलएनके ग्रीन एनर्जी प्रा. लि.’ कंपनीत भागीदार आहेत. या कंपनीने महाराष्ट्रात सौरपटल निर्मिती क्षेत्रात ४७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्र सरकारशी करार केला आहे. दावोस येथे पार पडलेल्या आर्थिक परिषदेत करण्यात आलेल्या या करारामुळे २५०० जणांना रोजगार मिळणार आहे. आता या कंपनीला शेंद्रा औद्योगिक वसाहतीत ६३ एकर जागा देण्याच्या हालचाली सुरू आहेत. डॉ. कराड यांचे पुत्र वरुण ‘एलएनके’ कंपनीत एक भागीदार असल्यामुळे

राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्य सरकार सध्या सौरऊर्जेच्या निर्मिती आणि वापरास प्रोत्साहन देत आहे. मराठवाड्यातील गायरान जमिनींवर सौर प्रकल्प उभारण्याच्या प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात मंजुरी देण्यात आली आहे. अगदी परळी औष्णिक वीज केंद्राच्या पडीक जागेतही एक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच जायकवाडी धरणात १ हजार ३४१ मेगावॅटचा प्रकल्प वन्यजीव मंडळाकडून मान्य करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा पाठपुरवठा डॉ. भागवत कराड यांनीच केला होता. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनीसाठी सुरू असणारे मोठे प्रयत्न लक्षात घेता पुढील काळात सौर पटलनिर्मिती कंपन्या या भागात येतील असे मानले जात होते. त्यात ‘एलएनके’ कंपनीचे नाव पुढे आले आहे. 

सहा गिगावॉट सौरपटलाचे उद्दिष्ट

’जायकवाडी धरणाच्या क्षेत्रातील या तरंगत्या सौर पटलामुळे २०३२ पर्यंत ६० गिगावॅट स्वच्छ वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

’देशभरात सौर ऊर्जाप्रकल्पांना गती दिली जात असताना त्यासाठी लागणार्‍या सौरपटलाच्या निर्मितीमध्ये एलएनके ही कंपनी महाराष्ट्रातून गुंतवणुकीत उतरली आहे.

’या कंपनीकडून सहा गिगावॅट सौरपटल बनविण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आल्याची माहिती दावोसमधील करारानंतर देण्यात आली होती.

हा प्रकल्प गुजरातला चालला होता. माझा मुलगा यात भागीदार आहे. पण त्यांच्या गुंतवणुकीमुळे एक मोठा प्रकल्प महाराष्ट्रास मिळाला. या गुंतवणुकीमुळे सौरपटलनिर्मितीला चालना मिळणार आहे.

– डॉ. भागवत कराड, खासदार, भाजप