छत्रपती संभाजीनगर : बेसुमार उपसा आणि कमी पाऊस यामुळे राज्यातील २२३ तालुक्यांमध्ये भूजल घसरले आहे. यातील २६ तालुक्यांतील परिस्थिती भीषण, तर ४२ तालुक्यांत गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळ संहितेमधील भूजलाचा निर्देशांकानुसार आता तालुक्यांची वर्गवारी करण्यात आली आहे. यानुसार मराठवाड्यातील १३ तालुक्यांची स्थिती गंभीर झाली आहे.

मराठवाड्यातील ८७५ विहिरींचे निरीक्षण केल्यानंतर सरासरी ४.७४ मीटरची घसरण दिसून आली आहे. सर्वसाधारणपणे टंचाई आराखडे बनवण्यासाठी पाच वर्षांच्या भूजलाची सरासरी पूर्वी गृहीत धरली जात असे. या वर्षी गेल्या दहा वर्षांतील सरासरी गृहीत धरून पाणीपातळी मोजण्यात आली आहे. मराठवाड्यात गेली चार वर्षे अतिवृष्टीची होती. तरीही धाराशिवसारख्या जिल्ह्यातील भूजल सरासरी ७.२२ टक्क्यांनी घसरली आहे. दुष्काळी निर्देशांकामध्येही या जिल्ह्यातील सात तालुक्यांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातही अनेक तालुक्यांमध्ये गंभीर स्थिती ओढावेल असे चित्र दिसून येत आहे.

बेसुमार पाणी उपशामुळे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील स्थिती कमालीची घसरली आहे. धाराशिवपाठोपाठ लातूर जिल्ह्यातील भूजलाची स्थिती ५.६० मीटरने घसरली आहे. पाणी उपशावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने किती विंधनविहिरी घेतल्या जातात, हे अजूनही माहीत होऊ शकलेले नाही.

विंधन विहिरीचा आधार

लातूर शहरात महापालिकेच्या मालकीच्या १ हजार ३४ विंधन विहिरी आहेत. यातील १३४ विंधनविहिरी बंद आहेत. पण भूपृष्ठावरील पाणी वाचवायचे असेल, तर काही पाणी विंधन विहिरीतून घ्यावे, असे नियाेजन आखले जात आहे. या प्रत्येक विंधनविहिरींसाठी एक कर्मचारीही नियुक्त करण्यात आला आहे. बंद पडलेल्या १३४ विंधनविहिरींमध्ये मोटार आहे का, हेही तपासले जात आहे.

२०१८ ते २०२६ या कालावधीमधील भूजलाच्या निर्देशांकांची तुलना करता २०१८ मध्ये गंभीर भूजल असणारे सात तालुके होते. आता यात मोठी वाढ झाली असून आठ वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळातील भूजलाचा निर्देशांक भीषण स्थितीमध्ये म्हणजे ०.६० पेक्षा कमी झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे गंंभीर भूजल दुष्काळामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन तालुके, तर रत्नागिरी जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा समावेश आहे. ८५ तालुक्यांमध्ये तुलनेने कमी भूजलाचा दुष्काळ जाणवेल. गेल्या आठ वर्षांत एकदाही भीषण स्थितीचे अहवाल नव्हते.

राज्यातील २५३ तालुक्यांतील पाण्याची पातळी खाली गेली आहे. दुष्काळ निर्देशांकही तेच सांगतो आहे. अपण अशा परिस्थितीमध्ये पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. – रवींद्र खेबुडकर, आयुक्त, भूजल सर्वेक्षण, महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्राच्या वाळवंटीकरणाची प्रक्रिया सुरू झाली असल्याचा अहवाल आयएसआरओ या संस्थेने २०१६ मध्ये दिला होता. हवामान बदल आणि वाळवंटीकरण यांचे नाते स्पष्ट आहे. राजस्थाननंतर महाराष्ट्र या स्थितीकडे चालला आहे, असे चित्र दिसत होते. हे भयावह आहे. अर्थात हे अपेक्षित आहे. आपण ज्या पद्धतीने पाण्याचा उपसा करतो आहोत, त्यावरून आणि उसाच्या अतिप्रेमामुळे हे सारे घडते आहे. – प्रदीप पुरंदरे, जल अभ्यासक