छत्रपती संभाजीनगर : विदेशी मद्य उत्पादन आणि विक्रीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. त्यास वाढलेले दर आणि आकारले जाणारे शुल्क हे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात येते. गेल्या वर्षी ७९५ लाख विदेशी मद्यनिर्मिती करण्यात आली होती. त्यात २०२ लाख लिटर मद्य उत्पादन घटले. केवळ उत्पादनात नाही तर विक्रीमध्येही ही घट २४ टक्के आढळून आली. परिणामी २४८२ कोटी रुपयांचा महसूल या वर्षी २३५० कोटी एवढाच राहिला. यात १३२ कोटी रुपयांची घट दिसून आली. विदेशी मद्यातून या राज्य सरकारला ३४९१ कोटी रुपयांचा महसुलाची अपेक्षा होती. तब्बल ११४१ कोटी रुपये त्यात कमी मिळाले.
विदेशी मद्य उत्पादन विक्री आणि घट होण्याची कारणे गेल्या वर्षी करण्यात आलेल्या धोरणात दडली असल्याचे सांगण्यात येते. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी मद्य निर्मिती केल्यास त्यांना आकारले जाणारे शुल्क आणि महाराष्ट्रातील अधिवासी असणाऱ्याने विदेशी मद्य निर्मितीचा कारखाना काढला तर त्याला लागणारे शुल्क यामध्ये मोठा फरक करण्यात आला. एका प्रुफ लिटर मागे तो ३२५ रुपयांचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योजकास अधिक लाभ मिळावा असे प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांनी निर्मितीमध्ये जवळपास २५ टक्के घट केली.
युनाटेड स्पिरिट, कोकण ॲग्रो, एबीडी, रॅडिको, ग्रेनॉच आणि ग्रीन लेबल या कंपन्यांचे नामांकित बॅन्ड छत्रपती संभाजीनगरमध्ये बनतात. या वर्षी या कंपन्यांनी विशेषत: युनायटेड स्पिरिट कंपनीने त्यांचे उत्पादन ४८ टक्क्यांनी कमी केले. गेल्या वर्षी त्यांनी २७६ लाख लिटर्स मद्य उत्पादन केले होते. या वर्षी केवळ १४४. ९९ लाख उत्पादन केले. विक्रीमध्येही फारसा उठाव दिसून आला नाही. मार्च अखेरपर्यंत या कपंनीच्या विविध ब्रॅन्डची विक्री ४६ टक्क्यांनी घसरली. ग्रेनॉच प्रा. लि. ही कंपनी वगळता अन्य चार कंपन्यांचे उत्पादनही घसरले आणि विक्रीमध्ये मोठा फटका बसला. परिणामी १३२ कोटी रुपयांचा महसूल बुडला. एबीडी, रॅडिको या दोन्ही कंपन्यांचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रत्येकी १५ टक्के घसरले.
दुसरीकडे कमी शुल्क असणाऱ्या महाराष्ट्रातील मालक असणाऱ्या चार कंपन्यांनी १३८ लाख लिटर्स मद्यनिर्मिती केली. त्यांना कमी शुल्क आकारण्यात आले. परिणामी महाराष्ट्र निवासी मालक असणाऱ्या कंपन्यांनी ४७१ कोटी रुपयांचा महसूल दिला. विदेशी कंपन्यांनी उत्पादन घटवले आणि नव्या कंपन्यांनी नवे ब्रॅन्ड बाजारात आणले. त्याचे परिणाम दिसून येत आहेत. दरम्यान मद्यपींना माहीत असणारे ब्रॅन्ड महाग मिळू लागल्याने विदेशी मद्य विक्रीत मोठी घट दिसून आली.
