नांदेड – महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजपा पुरस्कृत पॅनेलसह युवा गटाचाही दारूण पराभव करून ‘आयएमए-एमएमसी’ गटाने ९ पैकी ८ जागांवर यश प्राप्त केले आहे. या गटातून नांदेड मधील प्लास्टिक सर्जन डॉ. संजय कदम विजयी झाले.
राज्यातील अॅलोपॅथी डॉक्टरांशी संबंधित वरील निवडणूक आधी राज्य शासनाचा हस्तक्षेप आणि मग सत्ताधारी भाजपाने निवडणुकीतील डॉक्टरांच्या एका गटासाठी केलेल्या मोर्चेबांधणीमुळे राज्यभर चर्चेत आली होती.
गेल्या रविवारी मतदानादरम्यान भाजपाचे मंत्री, पदाधिकारी ठिकठिकाणी सक्रिय दिसले; तरी मतदारांनी भाजपा पुरस्कृत पॅनेलला नाकारले. या पॅनेलच्या छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. उज्ज्वला कराड दहिफळे ह्या एकमेव उमेदवार विजयी झाल्या. मराठवाड्यातील तिसरे उमेदवार डॉ. अमोल अन्नदाते यांचाही पराभव झाला. वरील निवडणुकीमध्ये ‘आयएमए-एमएमसी’ गटाच्या उमेदवारांना निवडून आणण्यात डॉ. सुहास पिंगळे आणि त्यांच्या सहका-यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या निवडणुकीत सरकार आणि भाजपा या दोघांनी केलेल्या हस्तक्षेपावर निवडणूक निकालानंतर समाजमाध्यमांत तीव्र प्रतिक्रियांची नोंद झाली आहे.
वरील निवडणुकीमध्ये ९ जागांसाठी तब्बल ६० उमेदवार रिंगणात उतरले होते. गेल्या रविवारी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली. १ लाख २३ हजार मतदारांपैकी केवळ १७ हजार १४९ मतदारांनी मतदान केले. त्यानंतर बुधवारी मुंबईमध्ये वैद्यकीय परिषदेच्या कार्यालयात सुरू झालेली मतमोजणी मध्यरात्रीपर्यंत चालली. त्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या कायद्यानुसार परिषदेवर राज्य शासनातर्फे ५ प्रतिनिधी नामनिर्देशित केले जातात. त्या शिवाय ४ शासन प्रतिनिधी परिषदेवर नेमले जातात. एकंदर १८ सदस्यांमधून परिषदेच्या अध्यक्षांची निवड केली जाते. आतापर्यंत निवडून आलेल्या सदस्यांमधूनच अध्यक्षांची निवड होत आली आहे.
नांदेडमधील डॉ. संजय कदम हे दुस-या क्रमांकाची मते घेऊन विजयी झाल्याबद्दल ‘आयएमए’च्या नांदेड शाखा पदाधिका-यांसह शहरातील अनेक डॉ़क्टरांनी आनंद व्यक्त केला. वरील निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या पॅनेलची सरशी व्हावी, यासाठी डॉ. संजय कदम यांनी जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये दौरा केला होता. मतदारांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी गुरुवारी सर्वांचे आभार व्यक्त केले.
परिषदेवरील विजयी उमेदवार
संतोष आप्पासाहेब कदम (७,३३० मते), संजय साहेबराव कदम (६९०१), निलेश वसंतराव निकम (५९८८), संजय गणेशराव देशपांडे (५८०४), सुनिल माधवराव इंगळे (५६३०), अनिलकुमार भास्कर पाटील (५५५०), मंगेश मधुकर गुलवाडे (५५०६), उज्ज्वला किशनराव कराड- दहिफळे (५३४५), अनिल शंकर पाचणेकर (५१६७).
