छत्रपती संभाजीनगर : समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांचे दोन्ही मुले सिंद्धात आणि मुलगी हर्षदा यांनी विजय मिळवला. दोन्ही मुलांची प्रतिमा महापौर पदासाठी निवड होईल असा दावा शिवसेनेकडून केला जात होता. दोन्ही मुले निवडून आली पण शिवसेनेचे शहराचे वर्चस्व कमी झाले. भाजपच मोठा भाऊ ठरल्याने दोन्ही मुलांपासून महापौर पद दूरच राहील, असे मानले जात आहे.
शिरसाट यांच्याबरोबरच जालना महापालिकेमध्ये रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे आणि भावजयी सुशिला दानवे या विजयी झाल्या. कॉग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर कैलास गोरंट्याल यांनी त्यांचा मुलगा अक्षय यांना उमेदवारी दिली होती. ते निवडून आले आहेत. भाजपने जालना शहरावर वर्चस्व निर्माण केले आहे. गेली अनेक वर्षे या शहरावर कॉग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशामुळे जालन्यातून भाजपने आतापर्यंत २८ जागांवर विजय मिळवला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिरसाट यांची दोन्ही मुले निवडून आली. पण प्रभाव मात्र कमी झाला. इटखेडा परिसरातील वार्डातून शिवसेनेचे सर्व उमेदवार पुढे होते. यात माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या पत्नीही निवडून आल्या आहेत.
शिवसेनेचेच (शिंदे) आमदार प्रदीप जैस्वाल यांचे चिरंजीव ऋषिकेश जैस्वाल हे सर्वसाधारण आरक्षण असलेल्या १५-ड प्रभागातून निवडून आले आहेत. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभाग १५-अ वाॅर्डातून विजयी झाले आहेत.
रावसाहेब दानवेंचे कुटुंबच राजकारणात
जालन्यामध्ये तर भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या घरातच भाऊ व भावजय, अशा दोन सदस्यांना निवडणुकीची उमेदवारी देण्यात आली होती. भास्करराव दानवे व त्यांच्या पत्नी सुशीला भास्करराव दानवे हे दोन्ही उमेदवार भाजपकडून निवडून आले आहेत. भाजपचे पालिकेतील हे पती-पत्नी कारभारी राहतील. या पूर्वी रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे भोकरदनचे आमदार आहेत. तर मुलगी संजना जाधव या कन्नडमधून आमदार आहेत. ते स्वत: पराभूत झाल्यामुळे ते पक्षाचे काम करत आहेत.
पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आमदार व आता अलिकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेले कैलास गोरंट्याल यांच्याही घरात मुलगा अक्षय व पत्नी संगीता गोरंट्याल यांना उमेदवारी दिलेली होती. हे दोन्हीही उमेदवार विजयी झाले आहेत.
जालन्यातील शिवसेनेचे (शिंदे) आमदार अर्जुन खोतकर यांची कन्या दर्शना विजय झोल यांचा राजकारणात प्रवेश झाला असून, पहिल्या जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना उतरवण्यात आले होते. दर्शना झोल या जालन्यातील प्रभाग १६ मधून शिवसेनेकडून विजयी झाल्या आहेत. त्यांच्या प्रचारासाठी त्यांच्याच शिवसेना पक्षाच्या आमदार तथा भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या असलेल्या संजना जाधव या प्रचारासाठी आलेल्या होत्या. शिवसेनेचे आमदार आमदार बालाजी कल्याणकर यांचे सुपूत्र सुहास कल्याणकर हे नांदेडच्या तिरोडा प्रभागातून निवडून आले आहेत.
