छत्रपती संभाजीनगर : राज्यातील कंत्राटदारांचे १८ हजार कोटी रुपये थकले असले तरी ही रक्कम राज्य कारभारात फार जास्त नाही. त्याची लवकरच तरतूद केली जाईल असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले. त्याच बरोबर राज्यात १५०० किलोमीटरचे रस्ते करण्यासाठी अशिएयन इंफ्रास्ट्रक्चर बँकेकडून निधीचे प्रस्ताव करण्यात आले आहेत. या निधीतून कोणत्याही आमदारांच्या मतदारसंघात अधिकचा निधी दिला जाणार नाही तर राज्याच्या अर्थचक्राला गती देणारे रस्ते उभे केले जातील, असेही ते म्हणाले.
राज्यातील कंत्राटदार प्रत्येक जिल्ह्यात आंदोलने करत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पैसेच नाहीत, असे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. किती देणी बाकी आहेत, या प्रश्नाच्या उत्तरात शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, ‘ गेल्या वर्षभरात २७ हजार कोटी रुपयांची देणी दिली आहेत. अजून १८ हजार कोटीची देणी बाकी आहेत. पण ती फार जास्त आहे असे नाही. त्याची तरतूद करुन ही रक्कमही कंत्राटदारांना लवकरच देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात होणारी कंत्राटदारांची आंदोलने त्यांचा अधिकार असल्याची टिप्पणीही त्यांनी केली.
दरम्यान संभाजीनगर ते शिरुर या प्रकल्पाची आखणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचे रेखांकन कसे असावे याविषयी चर्चा सुरू आहेत. या अनुषंगाने काही पाऊले लवकरच उचलली जातील. तसेच पुढील काळात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संभाजीनगर शहरातील शेंद्रा व बिडकीन या दोन्ही औद्योगिक वसाहतीला जोडणारा रस्ताही हाती घेतला जाणार आहे.
सार्वजिक बांधकाम विभागाकडून नव्याने घेतले जाणारे रस्ते दोन पर्यटनस्थळांना जोडणारे, औद्योगिक वसाहतींना जोडणारे किंवा दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारे असावेत असेच प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचा एक आराखडाही तयार करण्यात आला आहे. विभागील सार्वजिक बांधकाम विभागातील कामांचा आढावा त्यांनी घेतला. ज्या बांधकामाच्या दर्जाविषयी तक्रारी आहेत, ती कामे पुन्हा त्याच कंत्राटदाराकडून करुन घेतली जातील. कोणत्याही परिस्थितीमध्ये दर्जाबाबत डोळेझाक केली जाणार नाही. उलट अधिक दक्षतेने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
‘‘ काही जणांनी सार्वजिनिक बांधकामाची देणी ७० हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवत नेली. पण तशी परिस्थिती नाही. काही वेळा पाणी पुरवठ्याची देयकेही त्यात टाकलेली असतात. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाची देणी १८ हजार कोटी रुपयांचीच आहेत. बांधकाम विभागाकडून गुणवत्तेत तडजोड केली जाणार आहे. काम करतानाच कंत्राटदारांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. काही कामांची देखभाल कंत्राटदारांनी पुढील दहा वर्षे करावी असे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे कामे चांगली करू आणि त्यासाठी लागणारा निधीही तरतूद करुन दिला जाईल. – शिवेंद्रराजे भोसले, मंत्री सार्वजनिक बांधकाम
