नांदेड : राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील पंधरा शिक्षणसेवकांचा गेल्या वर्षभरात अपघात किंवा अन्य कारणांमुळे मृत्यू झाला असून शिक्षण विभागाने त्यांच्या कुटुंबीयांस वार्यावर सोडले आहे. या मुद्यासह राज्यातील शिक्षणसेवकांनी आपली कैफियत ‘मेणबत्ती फेरी’च्या माध्यमातून समोर आणली आहे.
शैक्षणिक वर्ष संपण्याच्या मार्गावर असताना मागील आठवड्यात नांदेडमधील अनेक शिक्षणसेवक एकत्र आले. नांदेडसह राज्यभरातील शिक्षणसेवकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधतानाच या पदाचा कालावधी पूर्ण करून नोकरीमध्ये कायम होण्यापूर्वीच १५ सेवकांवर काळाने झडप घातल्याने ‘मेणबत्ती फेरी’ नंतर त्यांना ठिकठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली.
शिक्षणसेवकांना दिले जाणारे मानधन तुटपुंजे आहे आणि ३ वर्षांच्या कालावधीदरम्यान मृत्यू झाल्यास त्या शिक्षणसेवकाचे कुटुंब उघड्यावर पडत आहे. त्याच्या वारसास नोकरी किंवा कोणताही वार्षिक लाभ नाही, ही बाब अन्यायकारक असल्याची भावना नांदेडमधील विनोद चव्हाण आणि आकाश करंडे या शिक्षणसेवकांनी व्यक्त केली. हे दोघेही नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालयात अध्यापन करतात.
शिक्षणसेवक ही योजना बंद करण्यासंदर्भात एक याचिका न्यायालयामध्ये दाखल झाली आहे; पण सरकार त्यात आपली भूमिका सपष्ट न करता वेळकाढूपणा करत असल्याचे वरील शिक्षणसेवकांनी सांगितले. शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे राज्यातील सर्व शिक्षणसेवकांना एकत्र आणून लढा उभारावा लागणार आहे, असे विनोद चव्हाण यांनी स्पष्ट केले.
शिक्षणसेवक पदावर कार्यरत असताना आतापर्यंत १५ जणांचा अपघात किंवा अकस्मात आजाराने मृत्यू झाला. एक महिला शिक्षणसेवक बाळांतपणातच दगावली; पण मायबाप सरकारच्या शिक्षण विभागाने अशा आपत्तीग्रस्तांसाठी आधार आणि मदतीबाबत कोणतेही धोरण ठरवलेले नाही, ही बाब चिंताजनक असल्याचे चव्हाण व करंडे यांनी नमूद केले.
अपघात व अन्य कारणांमुळे मृत झालेल्या शिक्षणसेवकांत प्रशांत तांबे (सिंधुदूर्ग), सूरज गायकवाड (यवतमाळ), प्रतीक घुसे (अमरावती), जीतेंद्र डाखोरे (अमरावती), आम्रपाली बोरकर (चंद्रपूर), मनिषा मोरे (कोल्हापूर), मनिषा घोडके (यवतमाळ), बाबासो शेळके (सांगली), मनिषा कर्हाळे (कोल्हापूर), अभिषेक किरणापुरे (गोंदिया), मयुरी जाधव (जळगाव), नंदकिशोर बुरडे (नवी मुंबई), नीलेश ठाकरे (पालघर) यांचा समावेश आहे.
