नांदेड : राज्याच्या शहरी व ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलांमध्ये सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे निर्माण होणार्या मानसिक, शैक्षणिक आणि सामाजिक समस्यांबाबत जिल्ह्यातील भाजपाचे आमदार राजेश पवार यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या मुद्याची दखल घेत त्यावर नियंत्रण घालण्यासाठी राज्य सरकारने टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
राज्याच्या वित्त मंत्रालयाच्या अलीकडील आर्थिक सर्वेक्षणामध्ये सामाजिक माध्यमांच्या वापरासाठी वयोमर्यादा निश्चित करण्याची शिफारस करण्यात आली होती. तत्पूर्वी मानसोपचार तज्ज्ञ संस्था व संबंधितांनी केलेल्या अभ्यासामध्ये अल्पवयीन मुलांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत असल्याचे निदर्शनास आले होते. ही बाब समोर आल्यानंतर माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या मंत्र्यांनी शासनास शिफारशी करण्यासाठी टास्क फोर्स निर्माण करण्याचे निर्देश दिले होते.
या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या भवितव्याची जाणीव ठेवत आ.पवार यांनी सोशल मीडियाचा अनियंत्रित वापर आणि त्यातून लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर होणार्या गंभीर परिणामांकडे सरकारचे लक्ष वेधले. राज्यातील अल्पवयीन मुलांची संख्या ४ कोटींहून अधिक असून त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याची जबाबदारी शासनावर असून शासनाने आवश्यक ते उपाय योजले पाहिजेत, अशी मागणी आ.पवार यांनी केली होती. त्यानुसार संबंधित मंत्र्यांनी जाहीर केलेल्या निर्णयावर आ.पवार यांनी समाधान व्यक्त केले.
भावी पिढीचे मानसिक आरोग्य चांगले राहावे, संस्कारक्षम शिक्षणाकडे त्यांचे लक्ष केंद्रीत व्हावे, ही सर्वांचीच जबाबदारी असून सरकारने या विषयावर घेतलेला टास्क फोर्सचा निर्णय म्हणजे योग्य दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल होय. टास्क फोर्सच्या अहवालानंतर राज्यामध्ये एक नवीन धोरण लागू होण्याची शक्यता बळावली आहे. – आ. राजेश पवार.
