नांदेड : राज्यातील मुंबईसह सर्व अकृषि विद्यापीठांमधील विविध प्राधिकरणांच्या निवडणुका विहित मुदतीत पार पाडून सर्व प्राधिकरणांवरील सदस्यांना त्यांचा कायद्यानुसार निर्धारित कार्यकाळ मिळण्याची खबरदारी घेण्यात यावी, तसेच विद्यापीठांशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये आठ वर्षांपासून थांबलेल्या विद्यार्थी संसद निवडणुकाही घेण्यात याव्यात, अशी मागणी अ.भा.वि.प. पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचने कुलगुरूंकडे केली आहे.
राज्यातील १३ अकृषि विद्यापीठांमध्ये स्थापन झालेल्या वरील मंचाच्या ठिकठिकाणच्या पदाधिकार्यांनी कुलगुरूंकडे सादर केलेल्या निवेदनाची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही कळविण्यात आली असून या मागण्यांची नोंद घेत त्यांनी सर्व कुलगुरूंची दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठक घेतल्याची माहितीही समोर आली.
विद्यापीठ कायद्यातील कलम ६२ (१) (२) अनुसार विद्यापीठ प्राधिकरणांच्या निवडणुका येत्या ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पार पाडणे बंधनकारक आहे. परंतु मागील काळात काही विद्यापीठांमध्ये प्राधिकरणांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे त्यावर निवडून आलेल्या सदस्यांना पूर्ण कालावधीपासून वंचित राहावे लागले. या पार्श्वभूमीवर सर्व कुलगुरूंनी प्राधिकरणांच्या निवडणुकांची प्रक्रिया कायद्यातील तरतुदींप्रमाणे सुरू केली पाहिजे, असे विद्यापीठ विकास मंचचे म्हणणे आहे.
विद्यापीठ कायद्यातील कलम ९९मध्ये विद्यार्थी संसद निवडणुकांसंदर्भात तरतूद आहे; परंतु २०१९ पासून विद्यार्थी संसदेच्या निवडणुका थांबलेल्या आहेत. त्या तात्काळ घेण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. नांदेडमध्ये विद्यापीठ विकास मंचचे विभाग निमंत्रक अॅड.केदार रामराव जाधव यांच्यासह अन्य काही प्रतिनिधींनी स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
विद्यापीठ परीक्षा पद्धती अधिक पारदर्शक व गतिमान व्हावी, विद्यापीठ कार्यक्षेत्रात प्रत्येक जिल्ह्यात विद्यापीठ उपकेंद्र सक्षम करण्यात यावे, विद्यापीठातील ‘प्रभारीराज’ संपवून रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्यात, विद्यापीठातील गुणवत्ता वाढीसाठी विशेष कार्य समिती स्थापन करण्यात यावी आदी वेगवेगळ्या मागण्यांचा वरील निवेदनात समावेश आहे. या निवेदनावर व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.प्रशांत पेशकार, डॉ.दीपक बच्चेवार, दीपक मोरताळे, परमेश्वर हासबे, डॉ.वर्षा डोडीया आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
महाविद्यालयांवर कारवाई करा
विद्यापीठाशी संलग्न असलेली महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून युवक महोत्सव, क्रीडा महोत्सव, वार्षिक अंक, राष्ट्रीय सेवा योजना अशा विविध उपक्रमांचे शुल्क आकारण्यात येते; पण बहुसंख्य महाविद्यालये कोणत्याही उपक्रमांमध्ये सहभागी होत नाहीत. अशा महाविद्यालयांवर कारवाई करण्यात यावी तसेच त्यांनी आकारलेले शुल्क विद्यार्थ्यांना परत करण्याचे बंधन घालण्यात यावे, अशी मागणीही आम्ही कुलगुरूंकडे केल्याचे अॅड.केदार जाधव यांनी सांगितले.
