महावितरणच्या ढिसाळपणामुळे एका चिमुकल्याला जीव गमवावा लागला. पथदिव्याच्या खांबाला लटकलेल्या तारांतून विजेचा प्रवाह गटारीच्या पाण्यात उतरला. गटारीत पडलेला चेंडू घेण्यास गेलेल्या ५ वर्षांच्या रोहन राजेश पवार याला विजेचा तीव्र धक्का बसला. यात या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. वाशी येथे सोमवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली.
रोहन हा सकाळी आठच्या सुमारास शाळेला जाण्यासाठी तयार झाला. शाळेला निघण्यास वेळ असल्याने तो घरासमोर चेंडू खेळत होता. त्याच्या घराशेजारी असलेल्या लोखंडी पथदिव्याला तार गुंडाळली होती. तारेची दोन टोके नालीमध्ये लोंबकळत होती. मात्र, निव्वळ महावितरणच्या ढिसाळपणामुळे विजेचा प्रवाह अनेक दिवसांपासून तसाच सुरू होता. गटारीत प्रवाह उतरल्याने या चिमुकल्याच्या जिवावर बेतले.
शाळेला जाण्यापूर्वी खेळत असलेल्या रोहनचा चेंडू खेळता खेळता गटारीत पडला होता. चेंडू काढण्यासाठी रोहनने नालीत हात घालताच त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. रोहनच्या मृत्यूमुळे पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. अनेक ठिकाणी पथदिव्यांवर अशा तारा लोंबकळत आहेत. केवळ महावितरणच्या दुर्लक्षामुळेच रोहनवर सोमवारी काळाने घाला घातला. मुलाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून ठोस कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.