छत्रपती संभाजीनगर : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीमध्ये भाजपने केसाने गळा कापला. राष्ट्रवादी कॉग्रेसपेक्षाही वाईट वागणूक भाजपकडून मिळत आहे, भाजपकडून शिवसेना संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे असे एकामागे एक सनसनाटी आरोप सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सोमवारी केले. त्यांच्या मुलाने विधानपरिषद निवडणुकीत अपक्ष अर्ज दाखल केला.

यामुळे ‘ महायुती ’ मध्ये मीठाचा खडा पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, सत्तार हे जर त्याचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ऐकत नसतील तर त्यांना काय मार्गदर्शन करणार, असा सवाल करत मंत्री अतुल सावे यांनी सत्तार यांना उत्तर दिले. हे सारे घडले भाजपचे उमदेवार सुहास शिरसाट यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना.

सत्तार यांच्या आरोपास उत्तर देताना सावे म्हणााले, ‘परभणी – हिंगोली मतदारसंघात त्यांचे सदस्य जास्त असल्याने ती जागा त्यांना देण्यात आली. अन्य तीन जागा भाजपला सुटल्या आहेत. त्यामुळे महायुतीच्या वतीने सुहास शिरसाट यांचा अर्ज भरला आहे. ‘महापालिकेत युती केली नाही, जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना – भाजपमध्येच जमले नाही. तर विधान परिषद निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर – जालना ही शिवसेनेच्या वाट्याची जागा भाजपला सुटली.

त्यामुळे आम्ही उमेदवार सुहास शिरसाट यांचा अर्ज दाखल केला आहे. महापालिकेमध्ये निवडणुकीमध्ये युती झाली नाही. मात्र, तरही उपमहापौर पद देऊन आम्ही युती धर्म जपला. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सत्तार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चुकीची माहिती दिली. शिवसेनेकडे ३७ सदस्य संख्या असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात २५ सदस्यसंख्या होती. मात्र, पुढे भाजपचा अध्यक्ष निवडून आणता आला. मात्र, सत्तार यांना आता काय बोलणार असे सावे म्हणाले.

दरम्यान विधान परिषद निवडणुकीमध्ये सात जणांचे सात जणांचे १२ अर्ज आले. फारुक हुंडीवाले अपक्ष, इसाक खान – सांडू खान, एमआयएम, देवयानी डोणगावकर – शिवसेना उद्धव ठाकरे, अब्दुल समीर अब्दुल सत्तार अपक्ष. सुहास त्र्यंबकराव शिरसाट – भाजप, गणेश लोखंडे – शिवसेना, तर विशाल नांदरकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला.

दरम्यान शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर अब्दुल सत्तार यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. सिल्लोड, पैठण आणि अन्य मतदारसंघात ५३ नगरसेवक आहेत. अन्य पक्षातील सदस्यांनी आग्रह केल्याने अर्ज दाखल केला आहे. या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ. ते जे सांगतील त्यावर पुढचे निर्णय घेत आहे. मित्र पक्षाकडून अशा प्रकारची वागणुकीची अपेक्षा नाही, असेही सत्तार म्हणाले. जिल्हा परिषद , महापालिका, जिल्हा बँका यातून तूर्त शिवसेनेला हद्दपार केले जात आहे. शिवसैनिकाला पद्धतशीरपणे संपवले जात असल्याचेही सत्तार म्हणाले. माझा नेता या अनुषंगाने जो निर्णय घेईल तो आम्हास मान्य आहे, असे सत्तार म्हणाले.