परभणी : येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड ही उद्या बुधवारी (दि.१८) होणार असून सत्तास्थापनेतील अनिश्चिततेला पूर्णविराम मिळाला आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा होणार की भाजप विरहित प्रयत्नांना यश मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तथापि आता राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आल्याने भाजपच्या सत्ता स्थापनेतला अडसर दूर झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संयुक्तपणे ही घोषणा केल्याने सर्व तर्क, वितर्काना पूर्णविराम मिळाला आहे.
जिल्हा परिषद निवडणूकीत ५४ पैकी २४ जागा मिळवून भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान प्राप्त केले असले तरी भाजपला निर्विवाद बहुमत नसल्याने सत्ता स्थापनेसाठी अन्य पक्षांच्या मदतीची गरज होती. महायुतीतल्या इतर दोन पक्षांपैकी राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून दूर ठेवण्याचा मनोदय भाजपच्या स्थानिक नेत्यांनी व्यक्त केला होता.
राष्ट्रवादीला बाहेर ठेवून शिंदे सेनेच्या मदतीने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याचा विचार भाजपच्या नेत्यांनी बोलून दाखवल्यानंतर राष्ट्रवादीनेही भाजप विरहित जिल्हा परिषद अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. राष्ट्रवादीच्या सदस्यांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, एकनाथ शिंदे शिवसेना व काँग्रेस या सर्व पक्षांची आघाडी करण्यात येऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा खटाटोपही गेल्या काही दिवसात करण्यात आला. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे काही सदस्य अज्ञातवासातही रवाना झाले होते.
वरिष्ठ पातळीवरून यासंदर्भात निर्णय स्थानिक पातळीवर महायुतीतल्या पक्षात विसंवाद असल्याचे लक्षात येताच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी यात लक्ष घातले. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या आधी भाजप व राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी एकत्र येऊन मुंबईत माध्यमांना परभणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा तर उपाध्यक्ष राष्ट्रवादीचा असेल असे सांगितले. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाचा निर्णय झाला आहे तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सभापतीपद देण्याचेही ठरले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव आहे. ही संधी कोणत्या तालुक्याला मिळणार याबाबत औत्सुक्य आहे. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या सेलू, जिंतूर विधानसभा मतदारसंघाकडे हे पद जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेत १५ सदस्य तर शिवसेना शिंदे गटाचे ५ सदस्य आहेत. महाविकास आघाडीपैकी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला ६ जागा तर काँग्रेस पक्षाला ३ जागा मिळालेल्या आहेत. एका जागेवर अपक्ष सदस्याचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्ष यांच्यात जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेला बेबनाव आता संपुष्टात आला आहे. आतापर्यंत दीर्घकाळ परभणी जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या सदस्य संख्येत अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांना काँग्रेसचा इशारा
परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसचे केवळ तीन उमेदवार सदस्य म्हणून निवडून आले आहेत. त्यामध्ये जितेंद्र गोपाळराव देशमुख, अजित अनिलराव वरपूडकर आणि जोत्स्ना गणेशराव घाटगे यांचा समावेश आहे. पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदेत गटनेता निवडीसाठी बोलाविलेल्या बैठकीस जोत्स्ना घाटगे यांनी उपस्थिती दर्शविली नाही. अजित वरपूडकर यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. गटनेता निवडीच्या बैठकीची सूचना मिळूनही उपस्थित न राहणे, गटनेता निवडीच्या जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रावर अधिकृत स्वाक्षरी न करणे, पक्षविरोधी भूमिका घेणे या कारणांमुळे पक्षाच्या वतीने कडक कारवाई करण्यात येईल. तसेच जिल्हा परिषदेचे सदस्यत्व देखील रद्द करण्यात येईल, असा इशारा पक्ष नेतृत्वाच्या वतीने घाटगे यांना देण्यात आला आहे.
